कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ शनिवार 17 जानेवारी रोजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात होणार आहे. 16 जानेवारी रोजी दीक्षांत समारंभाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन व विक्री होणार आहे. दीक्षांत समारंभाच्या नियोजनासाठी विविध समित्या नेमल्या आहेत. या समित्यांना विविध प्रकारची कामे नेमूण दिली आहेत. सध्या प्रमुख पाहुणे ठरवणे, पदवी प्रमाणपत्रांची छपाई यासह अन्य कामाची लगबग सुरू आहे. विद्यापीठातील समित्यांचे बैठका सत्र सुरू असून नियमानुसार काम करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.
दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, बैठक व्यवस्था, दीक्षांत पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्राचे वाटप, व्यासपीठावरील मान्यवरांचा ड्रेसकोड, यासह अन्य कामे नेमूण दिली जातात. त्यासाठी समित्या तयार केल्या आहेत. दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण होणार असल्यामुळे सर्वांनी जवाबदारीने काम करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. दीक्षांत समारंभाच्या कामासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, त्या कर्मचाऱ्यांना इतर कामे देऊ नये, असे विभागप्रमुखांनी सांगण्यात आले आहे. या समारंभाच्या कामाला प्राधान्य देवून सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाची माहिती व्हॉटसअॅपव्दारे पहिल्यांदाच कळवली जाणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने परीक्षा विभागात काम सुरू आहे. पदवी प्रमाणपत्राची छपाई करण्याच्या पार्श्वभूमीवर लागणारी तयारी विद्यापीठातील प्रेसमध्ये सुरू आहे. जेणेकरून पदवी प्रमाणपत्राची बिनचूक छापाई व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.








