ईडीकडून कारवाई
वृत्तसंस्था/ शिलाँग
पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी शिलाँगमधील एका विद्यापीठाच्या कुलगुरुची तसेच त्याच्या परिवाराच्या सदस्यांची सुमारे 20.28 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तींमध्ये नवी दिल्लीतील 19.28 कोटी रुपयांच्या 4 अचल संपत्ती आणि बँकेतील ठेवीच्या स्वरुपात 1 कोटी रुपयांची चल संपत्ती सामील आहे. पीएमएलए 2002 च्या तरतुदींच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
यापूर्वी शिलाँगमध्ये ईडीच्या उपक्षेत्रीय कार्यालयाने 3 जुलै रोजी अंतरिम जप्तीचा आदेश जारी केला होता, ज्यात सीएमजे विद्यापीठाचे कुलगुरु चंद्रमोहन झा तसेच त्यांच्या परिवाराच्या सदस्यांची 20.28 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचे म्हटले गेले होते. या अचल संपत्ती 2013-22 दरम्यान खरेदी करण्यात आल्या होत्या. ईडीने मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील पोलीस स्थानकात सीएमजे विद्यापीठाच्या विरोधात नोंद एफआयआरच्या आधारावर तपास सुरू केला होता. तर संबंधित तक्रार आयएएस अधिकारी एम.एस. राव यांनी तत्कालीन राज्यपाल आर.एस. मूशाहरी यांच्या निर्देशावर नोंदविली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सीएमजे विद्यापीठाला बंद करण्याचा आदेश दिला होता.









