स्वनिधीतून अध्यासन केंद्रांना अनुदान : राज्य शासनाकडून अनुदानाची अपेक्षा
कोल्हापूर/अहिल्या परकाळे
शिवाजी विद्यापीठातील बहुतांश अध्यासनासह अभ्यास केंद्रांना युजीसीकडून मिळणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ स्वनिधितून अध्यासन केंद्रांना अनुदान देत केंद्रांमध्ये संशोधनाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. विद्यापीठाने अध्यासन केंद्रांना उर्जितावस्था दिली असली तरी राज्य शासनाने अनुदान देवून अभ्यास केंद्रांचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अध्यासनाच्या माध्यमातून संशोधन करण्यासाठी युजीसीकडून अनुदान दिले जाते. युजीसीचे अनुदान बंद झाल्यानंतर राज्य शासनाने अभ्यास केंद्रांना अनुदान द्यायचे असते, हा नियम आहे. परंतू विद्यापीठाने सातत्याने प्रयत्न करूनही अद्याप पुरेसा निधी शासनाकडून दिला जात नाही. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे एक वर्षापूर्वी 10 कोटींचा निधी सरकारने दिला असला तरी, तो सर्वच केंद्रांसाठी दिलेला नाही. त्यामुळे पंडित नेहरू, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज मराठा, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर, विठ्ठल रामजी शिंदे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यासह अन्य अध्यासनांना शासन अनुदानाची गरज आहे. विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही.
विद्यापीठ प्रशासन स्वनिधितून अध्यासन चालवत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतू सर्वच अध्यासनाला न्याय द्यायचा असल्याने खर्चावर शेवटी मर्यादा पडतातच. तरीही विद्यापीठ प्रशासन सर्वच अध्यासन केंद्रांना न्याय देत संशोधन वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाला राज्य शासनाच्या अनुदानाची जोड मिळाल्यास समाजोपयोगी संशोधनासह महापुरूषांचा सखोल अभ्यासही करता येईल. आणि विद्यापीठ प्रशासनावर आर्थिक भार पडणार नाही.
राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राचे संशोधन अविरतपणे
राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राच्यावतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, रशियन अशा अनेक भाषांमध्ये शाहू चरित्राचा अनुवाद केला आहे. त्यामुळे जगभर शाहूंच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होत आहे. जगभरातील सर्वच भाषांमध्ये शाहू चरित्राचा अनुवाद करण्याचा मानस ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला आहे. शाहू कृतज्ञता पर्वातही विद्यापीठाने शाहू महाराज यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत रशियन आणि इटालियन भाषेत पुस्तकांचे प्रकाशन करून शाहूंना वंदन केले आहे. तसेच शाहू संशोधन केंद्रात सातत्याने संशोधन कार्य सुरू असल्याने या केंद्राला देश-विदेशातील संशोधकांनी भेटी देवून संदर्भग्रंथांचा वापर संशोधनासाठी करतात.
विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा
विद्यापीठातील महावीर जैन अध्यासन, गोडबोले अध्यासन, श्रीमती शारदाबाई अध्यासन, विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाला विद्यापीठासह लोकवर्गणीतून भरपूर निधी मिळतो. त्यामुळे या अध्यासनांचे सखोल संशोधन सुरू आहे. तसेच महावीर अध्यासनाच्या नवीन इमारतीसाठी जैन समाजातील बांधव आपआपल्या परिने मदतीचा हात पुढे करीत आहेत. भगवान महावीर जैन अध्यासनाचे नवीन बांधकाम लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
शासनाने अध्यासनाला अनुदान द्यावे
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासह अन्य एका अध्यासनाला सरकारने अनुदान दिले आहे. काही अध्यासनाला देणग्या मिळतात, तर काही अध्यासनाला देणग्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे स्वनिधीतून विद्यापीठ अध्यासनात संशोधनाचे कार्य करीत आहे. परंतू अध्यासनाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी राज्य शासनाने किंवा अन्य देणगीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)









