केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी एनसीईआरटीच्या 63 व्या स्थापनादिनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) आता अभिमत विद्यापीठ म्हणजेच डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आल्याचे प्रधान यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आहे.
एनसीईआरटी पूर्वीपासूनच संशोधन अन् नवोन्मेषाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असल्याने याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. देशभरात क्षेत्रीय आणि राज्य शिक्षण परिषद आता एनसीईआरटीच्या ऑफ-कॅम्पसच्या स्वरुपात कार्य करणार असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे.
एनसीईआरटी शालेय शिक्षण व्यवस्थेचा एक थिंकटँक आहे. भारतात शालेय शिक्षणासाठी पाठ्यापुस्तके निर्माण करणारी आघाडीची संस्था आहे. तसेच नवे राष्ट्रीय धोरण लागू करण्याची जबाबदारी एनसीईआरटीकडे आहे. याचबरोबर एनसीईआरटी संशोधन, नवोन्मेष, अभ्यासक्रम निर्मितीसह शिक्षण सामग्रीच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
एनसीईआरटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यावर त्याच्या मार्फत पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटचे अभ्यासक्रम सुरू होऊ शकतात. सेच एनसीईआरटीला अनेक प्रकारच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत ठरविण्याची जबाबदारीही सोपविली जाऊ शकते. परंतु यासंबंधी सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. लवकरच या सर्व गोष्टींसंबंधी शिक्षण मंत्रालयाकडून माहिती उपलब्ध केली जाणार असल्याचे मानले जात आहे.









