कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा हिरवाईने, जैवविविधतेने नटलेला आहे. विद्यापीठातील ही नैसर्गिक स्थळे संशोधकांसाठी सुद्धा आता प्रेरणास्थळे ठरत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. आता शिवाजी विद्यापीठातील तलाव आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकला आहे.
शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक डॉ. सुशीलकुमार जाधव यांनी ही किमया साधली आहे. एरव्ही विद्यार्थ्यांमध्ये सनसेट पॉईंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीत व नाट्याशास्त्र अधिविभागाशेजारील तलावामधील झाडाच्या प्रतिबिंबामध्ये त्यांना एका रासायनिक संयुगाच्या संरचनेचा आभास झाला. ते छायाचित्र त्याच ठिकाणाहून त्यांनी टिपले आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्प्रिंजर नेचर प्रकाशनाच्या ‘मॅक्रोमॉलेक्युलर रिसर्च‘ (मार्च 2025) या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान या छायाचित्राला लाभला.
या संदर्भात शिवाजी विद्यापीठातील नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराज कापसे आणि प्रणोती पाटील हे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांच्याच शोधनिबंधाच्या विषयास अनुसरून हे मुखपृष्ठ तयार केलेले आहे. या छायाचित्राचा वापर शोधनिबंधातील वैज्ञानिक माहिती कलात्मक पद्धतीने दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे.








