19 जुलैपासून मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील परीक्षांना प्रारंभ : पदवी व पदव्युत्तरच्या सर्व परीक्षा वस्तुनिष्ठ पध्दतीने : 50 गुणांसाठी 25 प्रश्न :ओएमआर शीटवर परीक्षा होणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सर्व परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ पध्दतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. पदवी व पदव्युत्तरच्या परीक्षांना 19 जुलैपासून मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील परीक्षांना प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाणार आहे. परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., बी. बी. ए., बी. सी. ए., एल. एल. एम., एम. एस. डब्ल्यू., बी. व्होक., बी. जे., एम.लिप., बी. फार्मसी., एम. फार्मसी यासह अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एम. ए.च्या परीक्षांना 7 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षा ऑगस्ट महिन्यात संपणार आहेत. या सर्व परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ पध्दतीने घेणार आहेत.
त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 50 गुणांची परीक्षा होणार आहे. (प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न प्रत्येकी 2 गुण), परीक्षेचा वेळ एक तासाचा असून वस्तुनिष्ठ (एमसीक्यू) पध्दतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ओएमआर शीटवर घेतली जाणार आहे. विद्यापीठ कायदा 2016 च्या आधीन राहून या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. सेमिस्टर एकच्या परीक्षा सकाळी 10 ते 11 या वेळेत होतील. सेमिस्टर दोनच्या परीक्षा दुपारी 1 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहेत. सेमिस्टर तीनच्या परीक्षा दुपारी 4 ते 5 या वेळेत होणार आहेत. तरी विद्यापीठाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावे, असे आवाहन विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.