शाळा म्हणजे एक पवित्र मंदिर, शाळा म्हणजे माता! प्रेमाचे, संस्काराचे प्रतीक! आयुष्यभराची शिदोरी विद्यार्थ्यांना कुठे मिळते तर ती याच शाळेत मिळते. शाळेसारख्या पवित्र वास्तुत शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्राचे भविष्य आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून या पवित्र विद्यामंदिरात विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्या लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या पाहून ही विद्यामंदिरे विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित वाटु लागली आहेत.
आजच्या आधुनिक समाजात शिक्षण ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया राहिलेली नाही. तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शाळा आणि महाविद्यालये ही महत्त्वाची पेंद्रे ठरतात. मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटना घडताना दिसत आहेत. अशा घटना केवळ पीडित विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर घाव घालत नाहीत, तर संपूर्ण शैक्षणिक वातावरणाला कलंक लावत आहेत. यामुळे पवित्र अशी विद्यामंदिरे चिमुरड्या विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित वाटु लागली आहेत. ज्या विद्यामंदिरात ज्ञानाचा दिवा अखंड तेवत तो चिमुरड्यांना विद्येची उब देतो. त्या विद्यामंदिरात हा तेजाचा दिवा शेवटचा घटका म्हणून की काय फडफडू लागल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यावर झालेला लैंगिक अत्याचार त्याच्या आयुष्याला अनेक स्तरांवर धक्का देतो. भीती, असुरक्षितता, नैराश्य आणि आत्मविश्वास हरवणे. तसेच शिक्षणात मागे पडणे, अभ्यासात लक्ष न लागणे. मित्र, कुटुंब आणि समाजाशी नातेसंबंध बिघडणे, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याचा परिपाक असा होतो की काही चिमुरडे विद्यार्थी भितीपोटी घराच्या बाहेर पडत नाहीत. तसेच कुटुंबियांना देखील काही सांगण्यास बिचकत असतात. मात्र अशा नराधमांना आळा घालण्यासाठी कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. 18 वर्षाखालील मुलांवरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला कडक शिक्षा ठरवण्यात आली आहे. तसेच अशा घटना घडल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्याचा हक्क पालक आणि पीडित विद्यार्थ्यांना आहे. तर अशा नराधमावर तत्काळ पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते. मात्र या कायद्याला देखील हे नराधम सरसावले आहेत. त्यांना अशा कायद्याची कोणत्याही स्वऊपाची भीती नाही. बदलापूर येथील शाळेतील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी नराधमाचा एन्काऊंटर केला तरी अशा घटना शाळा-महाविद्यालयात सरसकट सुऊ असल्याने ही विद्यामंदिरेच असुरक्षित झाली आहेत. अगदी काल-परवाचीच घटना कांदिवली येथील एका शाळेत दहावित शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर शिक्षकानेच सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर या नराधम शिक्षकाने मुलीला परिक्षेत नापास करण्याची धमकी देत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हे केवळ शाळा-महाविद्यालयातच दिसत नाही तर खेळाच्या मैदानावर देखील आढळत आहे. खेळाच्या मैदानावर प्रशिक्षकाकडूनच विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे वडाळा येथे क्रिकेट खेळणाऱ्या अल्पवयीन मुलांवरच अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा संशयीत अल्पवयीन मुलांना पोलिसानी डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठविले आहे. याठिकाणी यांच्यात सुधारणा झाली तर ठिक. अन्यथा मागचे पाढे पंचावन्न अशी गत होऊ नये.
एवढेच नाही तर विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात पुऊष शिक्षकच नाही तर महिला शिक्षिका देखील काही कमी नाहीत. 12 वीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण त्यालाच शिकविणाऱ्या एका 40 वर्षीय विवाहित शिक्षिकेकडून करण्यात आल्याचे उघड झाल्याने या महिलेला ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दादर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याआधी पुण्यातील खडक पोलिसांनी 10 वीत शिकत असलेल्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेच्या बंद वर्गात एका 25 वर्षीय शिक्षिकेकडून लैंगिक शोषण करताना तिला रंगेहाथ पकडले होते. तिलाही अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) अटक करण्यात आली होती. चेंबूर येथे घरी शिकवणीला जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या एक शिक्षिका प्रेमात पडली आणि त्याच्याबरोबर विवाहही केल्याचा त्या शिक्षिकेने दावा केला, परंतु पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून मुलगा अल्पवयीन असल्याने रोज घरी जाऊन विद्यार्थ्याचे ट्यूशन घेणाऱ्या महिलेला अटक केली. शाळा-महाविद्यालयातील असे धक्कादायक प्रकार रोज उघडकीस येत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर, बारामती, बुलढाणा, रायगड आदी जिह्यांत डझनभर विद्यार्थिनींवर शिक्षकांकडून अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. शाळा असो किंवा ट्यूशन क्लास असोत, तेथे अल्पवयीन मुले-मुली असुरक्षित आहेत. सज्ञान श्वापदांपासून अल्पवयीन मुलांना धोका निर्माण झाला आहे. शाळा- महाविद्यालयातील मुले ड्रग्जच्या आहारी जात आहेत. त्यांच्या समुपदेशनात सामाजिक संस्था, सरकार गुंतले असतानाच शाळा-महाविद्यालयातील विषयासक्त शिक्षक-शिक्षिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपली हवस भागविण्यासाठी हे वय बघत नाहीत की नाते पाहत नाहीत. एखादे श्वापद जसे आपल्या सावजावर तुटुन पडते, अगदी तसे हे तुटुन पडत आहेत. अशा नराधमांना शिक्षा देण्यात विलंब होत असल्यानेच ते याचा फायदा उचलत आहेत. ज्याअर्थी बदलापूर लैंगिक अत्याचारात पकडल्या गेलेल्या आरोपीचा एन्काऊंटर केला. अगदी त्याप्रकारचे एन्काऊंटर झाल्याशिवाय अशा प्रवृत्तांrना आळा बसणार नाही. आपले बाळ शाळेच्या विद्यामंदिरात सुरक्षित आहे, अशी भावना मनात ठेऊन बिनधास्त असणारे पालक अशा प्रकारच्या घटनांनी घाबरलेले आहेत. शाळा-महाविद्यालयातून मुलगा अथवा मुलगी घरी आल्यानंतर आस्थेने पाल्यांची विचारपूस करण्यात पालक देखील सजगता दाखवित आहेत.
कारण, अपप्रवृत्तींची नजर आपल्या पाल्यावर पडून त्याचे आयुष्य वेगळ्या वळणाला जाऊ नये, याची काळजी कित्येक पालक घेत आहेत. ज्याप्रकारे पालक सजग झाले आहेत, त्याप्रकारे शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतबाबत सजग रहायला हवे. अन्यथा अशा प्रवफत्तींमुळे शाळा-महाविद्यालयासारख्या विद्यामंदिराचे पावित्र्य संपून जाईल.
अमोल राऊत








