मेसॉनिक हॉल येथे आयाजन : रक्तदान शिबिरालाही प्रतिसाद
बेळगाव : युनायटेड ग्रँड लॉज लॉफ इंग्लंडच्या स्थापनेप्रित्यर्थ दरवर्षी साजरा होणारा वैश्विक बंधुत्व दिन येथील फ्रिमेसन्स लॉज व्हिक्टोरिया नं. 9 मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर मित्रत्व, आदर, सेवा आणि इतर कल्याणकारी उपक्रम फ्रिमेसन्सच्यावतीने राबविण्यात आले. रविवारी येथील मेसॉनिक हॉल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सिऑन आश्रममध्ये गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी 30 हजारांची देणगी देण्यात आली. पदवी अभ्यासक्रमासाठी श्रेया अहिरे या गरजू विद्यार्थिनीला 15 हजारांची शिष्यवृत्ती देण्यात आली. दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या समृद्ध फाऊंडेशनला 28 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. कॅन्टोन्मेंट येथील मराठी शाळेला 400 पाट्यांचे वितरण करण्यात आले. लॉजचा वार्षिक उपक्रम म्हणून एकल अभियानअंतर्गत एक शाळा दत्तक घेण्यात आली. कियान चिल्ड्रन्स होमसाठी धान्यांचे वितरण करण्यात आले. विद्या आधार उपक्रमासाठी रद्दी देणगीदाखल देण्यात आली. गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
विविध विधायक उपक्रम
वैश्विक बंधुत्व दिनाच्या पार्श्वभूमीवर केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 65 जणांनी रक्तदान केले. वनमहोत्सवाच्या निमित्ताने 400 रोपट्यांचे वितरण करण्यात आले.









