2005 ते 2021 या अवघ्या 15 वर्षात भारतातील एकूण 415 दशलक्ष म्हणजे 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राने जाहीर केला. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीवर संयुक्त राष्ट्राने भारताचे अभिनंदनपर उद्गार काढले आहेत.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठाने ऑक्सफर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) या उपक्रमाद्वारे जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक (MPI) च्या संशोधनाचा नविन अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार, भारतासह 25 राष्ट्रांनी 15 वर्षांत आपली गरिबी कमी करून जागतिक MPI मूल्ये यशस्वीरित्या निम्मे केले असल्याने या देशाची जलद प्रगती साध्य करणे शक्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या देशांमध्ये या देशामध्ये भारताबरोबर कंबोडिया, चीन, काँगो, होंडुरास, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार गेल्या एप्रिलमध्ये, भारताने चीनला मागे टाकून 142.86 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. तसेच, भारताने गरिबीत लक्षणीय घट केली असून, केवळ 15 वर्षांच्या कालावधीत (2005 ते 2021) 415 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडले असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
गरीबी कमी करणे शक्य असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले असले तरी कोविड-19 महामारीच्या काळात सर्वसमावेशक माहीतीच्या न मिळाल्यामुळे या दरम्यानच्या कालखंडातील मूल्यांकन करण्यास आव्हाने उभी राहिली असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
भारतातील 415 दशलक्ष गरीब लोक गरिबीतून बाहेर पडल्याने ती 55.1 टक्क्यांवरून 16.4 टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे.
2005/2006 मध्ये, भारतातील सुमारे 645 दशलक्ष लोक दारिद्र्यात होते, ही संख्या 2015/2016 मध्ये सुमारे 370 दशलक्ष आणि 2019/2021 मध्ये 230 दशलक्ष इतकी घसरली असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामध्ये सर्वात गरीब राज्ये आणि वंचित जाती गटातील लोकसंख्येचा मोठा समावेश आहे. भारतातील गरीब आणि पोषण निर्देशांकाखालील वंचित असलेले लोक 2005/2006 मधील 44.3 टक्क्यांवरून 2019/2021 मध्ये 11.8 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तसेच बालमृत्यूचे प्रमाण 4.5 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांवर घसरला आहे.