केएससीए फोर्थ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय फोर्थ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघाने एसकेई सोसायटी स्पोर्ट्स अकादमीचा तर युनियन जिमखाना बी संघाने टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमीचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. अंकित मुदलियार (युनायटेड बालाजी), राहुल नाईक (युनियन जिमखाना), यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट मैदानावरती आयोजित केलेल्या पहिल्या सामन्यात एसकेई सोसायटी स्पोर्ट्स अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 23.2 षटकात सर्व गडी बाद 101 धावा केल्या. तेजस लेंगडेने 2 चौकारांसह 22, प्रेम पाटीलने 2 चौकारांसह 20, तर कृष्णा रे•ाrने 13 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे वासू लमाणीने 13 धावात 3, अजित सोंडकरने 23 धावात 3, तर आनंद शिंदे व सुनील लमानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघाने 11.2 षटकात 2 गडी बाद 104 धावा करून सामना 8 गड्यानी जिंकला. त्यात अंकित मुदलीयारने 2 षटकार 8 चौकारांसह 55, बसवंत सुरेकरने 4 चौकारासह 24, तर वैभवने 21 धावा केल्या. एसकेईतर्फे अशोक व प्रेम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट कोचिंग आकादमीने प्रथम फलंदाजी करताना 27.3 षटकात सर्व गडीबाद 164 धावा केल्या. त्यात विनायक कांबळेने एक षटकार 5 चौकासह 43, ओमकार पाटीलने 2 षटकार 2 चौकारांसह 35, सुरज टंडलने 2 चौकारांसह 25, मलाया एम.ने 21 तर शुभम यादवने 13 धावा केल्या. युनियन जिमखाना तर्फे राहुल नाईकने 24 धावात 5, तर संदीप चव्हाण, रोहित देसाई, शुभम, मिलिंद चव्हाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना बी संघाने 28.3 षटकात 9 गडी बाद 168 धावा करून सामना एक गड्यांनी जिंकला. त्यात शुभम भादवणकरने 3 षटकार 3 चौकारांसह 49, सुशांत पाटीलने 38, रोहित पोरवालने 1 षटकार 2 चौकाराचा 28, राहुल नाईकने 2 चौकारासह 19 तर आर्यन कांबळेने 14 धावा केल्या. टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमीतर्फे ओमकार पाटीलने 32 धावात 4, रोहित दो•वाडने 29 धावात 3, ओमकार चव्हाणने 2 गडी बाद केले.









