वृत्तसंस्था/ दुबई
2023 साली होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या विश्वचषक आशियाई पात्र फेरीच्या क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिरात भूषवणार आहे. या पात्रफेरीच्या स्पर्धेत सहा संघांचा समावेश असून हे सामने संयुक्त अरब अमिरातमधील अजमान या शहरातील मलिक मैदान 1 आणि 2 तसेच ईडन गार्डन्स या मैदानावर खेळविले जाणार आहेत.
या पात्रफेरीच्या स्पर्धेत यजमान संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग, कुवेत, मलेशिया, नेपाळ आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. सदर स्पर्धेला गुरुवारपासून सुरू झालेली ही स्पर्धा 2 मार्चपर्यंत चालणार आहे. आयसीसीची 19 वर्षाखालील पुरुषांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2024 साली श्रीलंकेत होणार आहे. संयुक्त अरब अमिरातमधील सहभागी होणाऱया सहा संघांचे यापूर्वीच येथे आगमन झाले आहे. 24 फेब्रुवारीला यजमान संयुक्त अरब अमिरात आणि मलेशिया यांच्यात सामना होणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुवेत आणि हाँगकाँग यांच्यात दुसरा सामना खेळविला जाईल. 2020 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातने आपली पात्रता सिद्ध केली होती. यावेळी संयुक्त अरब अमिरात संघाचे नेतृत्व अष्टपैलू अयान खानकडे सोपविण्यात आले आहे. नेपाळ संघाचे नेतृत्व देव खनाल करीत आहे. हाँगकाँग संघाने या स्पर्धेसाठी आपला संघ भक्कम निवडला आहे. अहान त्रिवेदी या संघाचा कर्णधार आहे.









