वृत्तसंस्था/ दालियान
‘एएफसी’ 23 वर्षांखालील आशियाई चषक 2024 स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीकडून 0-3 असा पराभव झाला. येथील दालियान सुओयुवान स्टेडियमवरील या सलग दुसऱ्या पराभवाने भारताच्या मोहिमेचा शेवट झाला आहे. त्याआधी चीनकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागल्याने भारत ‘जी’ गटात तळाशी राहिला आहे.
संयुक्त अरब अमिरात चार गुणांसह आणि अधिक चांगल्या गोलफरकासह गटात अव्वल स्थानावर आहे. चार गुण झालेल्या चीनपुढे आता दुसऱ्या स्थानावर असलेल्या चार सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक म्हणून पुढील फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांना परिस्थितीची निकड जाणवून त्यांनी जोरात प्रारंभ केला.
26 व्या मिनिटाला संयुक्त अरब अमिरातीने आघाडी घेतली. यावेळी भारतीय बचावपटूंची गोलक्षेत्रात गोंधळात पडल्यासारखी स्थिती झाली होती. पंच आणि त्यांचे साहाय्यक यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर मोहम्मद अब्बास अल्ब्लुशी याला गोल बहाल करण्यात आला. मध्यांतरानंतर अवघ्या तीन मिनिटांत सुलतान आदिल अलमिरीने गोलक्षेत्रातून हाणलेला फटका जाळ्यात जाऊन ही आघाडी दुप्पट झाली. सामना हातातून निसटत असल्याचे जाणवून भारताने बरोबरीसाठीच्या प्रयत्नांवर जोर देऊन त्यादृष्टीने चेंडू खेळवायला सुरुवात केली. तथापि संयुक्त अरब अमिरातीच्या बचावफळीने भारतीयांना दूर ठेवण्यात यश मिळविले.
मध्यांतरानंतर लगेच पार्थिव गोगोईने उजवीकडून आक्रमक धाव घेतली होती, परंतु त्याचा क्रॉस सर्व आघाडीपटूंना हुकला. भारताचे मुख्य प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी पुढे दोन बदल केले आणि संजीव स्टॅलिन व पार्थिव गोगोई यांच्या जागी रबीह अंजुकंदन आणि सौरव यांना आणले. मात्र प्रतिआक्रमण करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत थांबलेल्या संयुक्त अरब अमिरातीने पुढे मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. गोलरक्षक हमाद अब्दुल्ला अल्मेकबालीने हाणलेल्या फटक्यावर चेंडू ताब्यात घेत ईसा खलफानने 3-0 अशी आघाडी वाढविली.









