सुधाकर काशीद,कोल्हापूर
जोतिबाची यात्रा ऐन भरात आलेली असते. गुलालाच्या उधळणीमुळे साऱ्या आसमंताला गुलाबी किनार लाभलेली असते. आणि या गुलालाच्या उधळणीत उंच सजवलेल्या सासन काठ्यांची मिरवणूक हलगी,घुमके,पिपाणी आणि कैचाळाच्या ठेक्यावर एका सुरात डोलत असते. उंच काठीवरचे निशाण या ठेक्यावर एकसारखे हेलकावत असते.आणि जणू ते निशाण चांगभलंचा गजर क्षणाक्षणाला वाढवत असते.म्हणजेच या गजरात सारी यात्रा बघता बघता टिपेला जाऊन पोहोचते.वाडी रत्नागिरी येथील जोतिबा यात्रेत दरवर्षी दिसणारे हे चित्र. किंबहुना यात्रेतील डौलाने नाचवल्या जाणाऱ्या सासन काठ्या म्हणजे जोतिबा यात्रेचा उतुंग असाच क्षण.
वाडी रत्नागिरी येथील जोतिबाचे धार्मिक महत्त्व खूप आहे.निम्म्या महाराष्ट्राचे कुलदैवत जोतिबा आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाशी या दैवताचे एक वेगळे नाते आहे.त्यामुळे जोतिबा यात्रा लाखाच्या पटीत हे तर ठरूनच गेले आहे. आणि बदलत्या काळाच्या ओघातही या यात्रेतल्या सासन काठ्यांचे महत्त्व आजही कायम राहिले आहे. किंवा यात्रेतील सासन काठ्यांची पालखीसोबत निघणारी मिरवणूक म्हणजेच यात्रेचा उत्कंठ बिंदू ठरला आह.
यात्रेतील सासनकाठ्यात खूप श्रद्धा दडली आहे या श्रद्धेबरोबरच प्रत्येक सासनकाठीला एक वेगळा मान आहे. संदर्भ आहे. एवढेच काय यात्रेतील 98 नोंदणीकृत परंपरागत सासनकाठ्यांची शासन दरबारीही नोंद आहे. आणि त्यामुळेच या सासनकाठ्यांचा डौल या क्षणीही कायम आहे. किंबहुना अनेक वेळा यात्रेत मान अपमानाचे जे प्रसंग घडले आहेत त्याला सासनकाठीच्या अस्मितेचे कारणच कारणीभूत ठरले आहे.
यात्रेतील सासनकाठी मिरवणुकीत 98 सासन काठ्यांचा मान आहे त्या मानाच्या काठीत पाडळी (जिल्हा सातारा) येथील काठीला पहिला मान आहे. त्यानंतर मौजे विहे (तालुका पाटण,) कसबा डिग्रज हिम्मतबदुर चव्हाण (तालुका मिरज), हिम्मत बहादुर चव्हाण निगवे, (तालुका करवीर) उधाजीराव चव्हाण (तालुका करवीर ),कसबा सांगाव तालुका कागल,) किवळ (तालुका कराड) असा त्या पाठोपाठ सासनकाठ्यांचा मान आहे. या मानानेच सासनकाठ्या मिरवणुकीत प्रवेश करतात.व या प्रत्येक काठ्यांसोबत आलेले हजारो भावीक यात्रेच्या सोहळ्याची रंगत आणि भव्यता दिव्यता वाढवतात.
मानाची पहिली पाडळीची काठी यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येते. ही काठी अखंड 60 ते 70 फूट उंचीची असते. काठीवर रेशमी वस्त्र असते. एवढी उंच कळकाची काठी तोल सांभाळत नाचवणे हे आव्हान असते. आणि काठीला असलेले दोर बाजूला थांबलेल्या लोकांच्या हातात असतात. अतिशय कसबाने ते उंच काठीला नाचवत नाचवत मिरवणुकीतून पुढे घेऊन जात असतात.
मानाच्या प्रत्येक काठीसोबत त्या त्या गावातील पाच सहाशे लोक सोबत असतात. यात्रेसाठी ते ठरवूनच आपल्या कामाला,नोकरीला,व्यवसायाला आठ ते दहा दिवसाची सुट्टी घेतात. अन्य गावी असणारे लोक यात्रेसाठी सासनकाठी सोबत येतात.
यात्रेतील या मानाच्या काठ्या डोंगरावर मंदिराजवळ कोठे थांबवायच्या, या काठी सोबत आलेल्यांनी आपला तळ डोंगरावर कोठे टाकायचा याचीही परंपरा ठरली आहे. काळाच्या ओघात यात्रा सुरळीत पडावी, भर गर्दीच्या यात्रेत सासनकाठीची कोठे अडचण होऊ नये म्हणून सासनकाठीची उंची कमी करण्याचे दरवर्षी आवाहन केले जाते. पण जोतिबावरील भक्ती जशी मोठी, तशी सासनकाठीची उंचीही मोठी मानली जाते. त्यामुळे काठीची उंची कमी करण्याचे आवाहन दरवर्षी असले तरी सासनकाठीची उंची व डोल परंपरागतच राहिला आहे. आणि तो तसाच राहणार असाच एकूण यात्रेचा पायंडा आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









