मंदिरांच्या भिंतीवर लोकांची नावे आणि मोबाइल क्रमांक लिहिण्यात आल्याचे प्रकार तुम्ही पाहिले असतील. पंतु छतरपूरमध्ये एका मंदिरात दर्शन घेतल्यावर लोक स्वत:च्या वाहनांचा नंबर लिहितात. येथील भिंतीवर अनेक राज्याच्या वाहनांचे नंबर लिहिण्यात आले आहेत. वाहनांचे नोंदणी क्रमांक लिहिण्यामागे एक अनोखी मान्यता असून लोक आजही यावर विश्वास ठेवतात.
छतरपूर जिल्ह्यातील कुसमा गावात असलेल्या मंदिराच्या भिंतीवर अनेक वाहनांचे नोंदणी क्रमांक लिहिण्यात आले आहेत. या मंदिराच्या भिंतीवर जो स्वत:च्या वाहनाचा क्रमांक लिहिल त्याचे वाहन सुरक्षित राहते आणि लवकरच दुसरी गाडी खरेदी करण्याचे भाग्य त्याला प्राप्त होते अशी मान्यता आहे.
या मंदिरात दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येत असतात. अनेक भाविकांनी वाहनांसंबंधी येथे प्रार्थना केली असून ती पूर्ण देखील झाली आहे. याचमुळे या मंदिराच्या भिंतींवर हजारो वाहनांचे नोंदणी क्रमांक दिसून येतात.या मंदिराला लोक सती माता मंदिर म्हणून ओळखतात. या मंदिराच्या भिंतींवर महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणात नोंदणीकृत असलेल्या वाहनांचे क्रमांक लिहिले गेले आहेत.









