खड्ड्यांभोवती रेखाटली रांगोळी : तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावर सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी रेखाटून सरकारी कामांचा निषेध करण्यात आला. उड्डाणपुलावरील खड्डे दोन दिवसांत न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. नैर्त्रुत्य रेल्वेने अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे अंडरपास ब्रिजच्या कामाला महिनाभरापूर्वी सुरुवात केली. त्यामुळे ही सर्व वाहतूक तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलामार्गे वळविण्यात आली. यामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीत वाढ झाली आहे.
परंतु, वर्षभरापूर्वीच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहेत. खड्डे चुकविताना दुचाकीचालक पडून जायबंदी होत आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबद्दल सोमवारी नागरिकांनी आंदोलन केले. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांवर रांगोळी घालण्यात आली. तसेच याला जबाबदार कोण? असे फलक दाखविण्यात आले.पावसामुळे खड्ड्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तसेच महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याला दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनगोळ अंडरपास ब्रिजचे काम चुकीच्या पद्धतीने
नैर्त्रुत्य रेल्वेकडून अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे अंडरपास ब्रिज केले जात आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे या ठिकाणी ब्रिज केला जात असल्याने स्थानिकांचा विरोध आहे. अनगोळ ही रहिवासी वसाहत असल्याने त्या ठिकाणी इतक्या मोठ्या अंडरपास ब्रिजची गरज काय? त्यामुळे स्थानिकांना विचारात न घेता काम सुरू असून महानगरपालिकेलाही याबाबतची अधिक माहिती नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात येत आहे.









