एकावर एक चढविल्या 7 कार
चीनची कार निर्माता कंपनी चेरी स्वत:च्या नव्या ईक्यू7 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरला चालना देण्यासाठी अजब अन् अनोखी मार्केटिंग कल्पना राबवत आहे. कंपनीने स्वत:च्या वाहनाची अॅल्युमिनियम बॉडी किती मजबूत आहे हे दाखविण्यासाठी लढविलेली शक्कल पाहून सर्वजण अचंबित झाले आहेत.
चेरीची नवी ईक्यू7 इलेक्ट्रिक कार मागील महिन्यातच बाजारपेठेत दाखल झाली आहे. याची गुणवत्ता अन् दरात संतुलन असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची ड्रायव्हिंग रेंज पूर्णपणे चार्ज बॅटरीवर 412-512 किलोमीटर आहे. परंतु हीच क्षमता अन्य कंपन्यांच्या वाहनात देखील आहे, याचमुळे चेरी कंपनीने काहीतरी वेगळे करून दाखविले आहे. चेरीने किमान 7 ईक्यू7 कार्सना एकावर ठेवून टॉवरचे स्वरुप देत स्वत:च्या एलएफएस अॅल्युमिनियम बॉडीची मजबुती दाखवून दिली आहे. कमाल सुरक्षा मानांकन प्राप्त करण्यासाठी एका वाहनाला स्वत:च्या वजनाच्या 4 पट अधिक वजन पेलण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. परंतु चेरी कंपनीने 7 ईक्यू7 वाहनांना एकमेकांच्या वर ठेवले आणि त्यांना सुरक्षित करण्यासाठी वाहनांदरम्यान विशेष धातू प्लॅटफॉर्म देखील ठेवला. याचाच अर्थ खालील कारने स्वत:च्या वर असलेल्या 6 कार्सचे वजन उचलले आहे.
युरोपीय कंपनी वोल्वोचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. 1980 च्या दशकापासून ही कंपनी याच मार्केटिंग रणनीतिचा वापर करत आहे. 2021 मध्ये देखील सात एक्ससी60 क्रॉसओव्हरला एकमेकांवर वर ठेवण्यात आले होते असे ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या तज्ञांनी सांगितले आहे. चीनबाहेर त्याच्याकडून निर्मित वाहनांच्या क्षमतेबद्दल मोठी साशंकता आहे. याचमुळे चेरी कंपनीने काहीतरी नवे करून दाखवत लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न चालविला आहे.









