मानेवर काढून घेतला कंपनीच्या लोगोचा टॅटू
जर कुठलाही कर्मचारी स्वत:च्या कामाबद्दल प्रामाणिक असेल आणि त्याला स्वत:ची कंपनी पसंत असेल तर अनेक मार्गांनी कंपनीबद्दल तो प्रेम दर्शवितो. अनेक लोक वर्षांनुवर्षे एकाच कंपनीत काम करतात. काही लोक ओव्हरटाइम देखील करतात, जेणेकरून डेडलाइनपर्यंत काम पूर्ण करता येऊ शकेल किंवा जर कंपनी संकटातून जात असेल तरीही ते काम सोडत नाहीत.
कॅनडात राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या इसमाने या सर्वापुढे जात काही असे करून दाखविले आहे की, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाहीत. 2007 पासून एकाच कंपनीत काम करत असलेल्या रामिंदर ग्रेवालने एकाच कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर ते पार्टनर आणि अध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आता कंपनी स्वत:साठी किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखविण्यासाठी त्याने स्वत:च्या मानेवर कंपनीच्या लोगोचा टॅटू काढून घेतला आहे.
मानेवर काढण्यात आलेल्या टॅटूचे छायाचित्र रामिंदरने स्वत:च्या लिंक्डइनवर शेअर केले आहे. हा एक बोल्ड आणि परमनंट टॅटू असून याची छायाचित्र शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. पोस्ट शेअर करत रामिंदरने स्वत:च्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
जेव्हा तुम्हाला तुमच्या टीमवर, काम आणि मिशवर गर्व असतो, तेव्हा तुम्ही नेहमीच सोबत घेऊन वाटचाल करता. काही लोक स्वत:च्या भावना दाखविण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि मी याहून उघडपणे असे केले असल्याचे रामिंदरने म्हटले आहे. या पोस्टवर अनेक लोकांनी कॉमेंटही केली आहे.









