लंच बेकनंतर येणाऱया झोपेमुळे कर्मचारी त्रस्त असतात. काही कर्मचारी कॉफी-चहा पिऊन झोप पळवून लावतात. तर काही लोक डेस्कवरही एक डुलकी घेत असतात. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने कर्मचाऱयांच्या मनातील बाब ठळकपणे समोर आली आहे. लिंक्डइनवर शेअर या व्हिडिओला सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल करण्यात आले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका डेस्कसोबत काही फोल्डिंग बेड लावल्याचे दिसून येते. प्रारंभी एक महिला बसून मोबाइल हाताळताना दिसून येते, परंतु काही सेकंदांनी ती सीटला बेडमध्ये बदलते आणि चादर ओढून मस्त झोपून जाते. हा व्हिडिओ पाहून शेकडो युजर्स अशाप्रकारच्या कार्यसंस्कृतीची मागणी करत आहेत. तर काही युजर्सनी या व्हिडिओच्या सत्यतेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. हा व्हिडिओ कुठल्याही कार्यालयातील वाटत नाही, कारण डेस्कवर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप दिसून येत नसल्याचे एका युजरने म्हटले आहे.

लंच ब्रेकमधील डुलकी
हा व्हिडिओ लिंक्डइनवर पास्कल बॉर्नेटने शेअर केला होता. आशियातील काही देशांमध्ये ऑफिस लंच नॅप्स सर्वसाधारण बाब आहे. डॉक्टर देखील याचा सल्ला देतात. ही संस्कृती अन्य देशांमध्येही असायला हवी असे पास्कलने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत 23 हजारांहून अधिक लाइक्स आणि सुमारे 2 हजार शेअर प्राप्त झाले आहेत. तसेच दीड हजारांहून अधिक युजर्सनी यावर स्वतःची कॉमेंट दिली आहे.









