श्वानांचा जन्मदिन, बोर्डिंगसाठी विशेष सेवा
पाळीव प्राणी बाळगण्याचा प्रकार देशात वेगाने वाढत आहे. परंतु पाळीव प्राणी बाळगणे एक मोठय़ा जबाबदारीचे काम आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याच्या देखभालीसह त्याला घरात आनंदी वातावरण देणेही महत्त्वाचे असते. याचमुळे अनेकदा पाळीव प्राण्याला त्याच्यासाठी अनुकूल कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये नेत त्याचे लाड केले जात असल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये आता एक असा ‘ढाबा’ सुरू करण्यात आला आहे, जो केवळ श्वानांसाठी आहे.
इंदोरमधील बलराज झाला आणि त्यांच्या पत्नीने या डॉगी ढाब्याची सुरुवात केली आहे. झाला हे स्वतः एक श्वानप्रेमी आहेत. या ढाब्यात श्वानांसाठी भोजन, राहण्याची आणि जन्मदिन साजरा करण्याची पूर्ण व्यवस्था आहे. याचबरोबर या ढाब्यातून श्वानासाठी फूड डिलिव्हरी आणि पार्सलची सेवाही दिली जाते. तसेच ढाब्यामध्ये श्वानांच्या जन्मदिनानुसार केकही तयार केला जातो.

कोरोनावेळी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान श्वानांनाही अन्न मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे जाणवले. त्यानंतर मी भटक्या श्वानांना अन्न पुरविण्यास सुरवात केली होती. यादरम्यान मला श्वानांसाठी एक ढाबा सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर पत्नीसोबत 2020 मध्ये हा ढाबा सुरू केला. आमच्या ढाब्यातून ऑनलाईन डिलिव्हरी देखील केली जाते. डॉग फूड डिलिव्हरी बॉय असून ते दिवसभर श्वानांसाठीच्या भोजनाची डिलिव्हरी करत असतात अशी माहिती झाला यांनी दिली आहे.
7-500 रुपयांपर्यंतचे भोजन
डॉगी ढाब्यामध्ये शाकाहारी सतेच मांसाहारी दोन्ही प्रकारच्या भोजनाची व्यवस्था आहे. याचबरोबर श्वानांसाठी पूरक आहार देखील उपलब्ध आहे. ढाब्यावर श्वानांसाठीच्या भोजनाचे मेन्यूकार्ड उपलब्ध असून त्यात 7 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या खाद्यपदार्थांचा उल्लेख आहे.
बोर्डिंग सेवाही उपलब्ध
हा ढाबा श्वानांसाठी बोर्डिंग सेवा देखील प्रदान करतो. व्यायाम, खेळ, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक कारणांसाठी श्वानांच्या मालकाला बाहेर जावे लागल्यास पाळीव प्राण्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे पाहिले जाते.









