ममता मॅम शाळेत न आल्याने विद्यार्थ्याने केले अजब कृत्य
शालेय दिवसांमध्ये प्रत्येकाचे कुणीतरी पसंतीचा शिक्षक असतो. अशा स्थितीत शिक्षक शाळा सोडून जातो किंवा काही दिवस सुटीवर जातो तेव्हा विद्यार्थ्यांचे मन उदास होते. प्राथमिक शाळेतील मुलांना एखाद्या शिक्षकाबद्दल आत्मियता वाटू लागल्यास आणि तो शिक्षक न आल्यास काय होईल याचा विचार करा? सोशल मीडियावर सध्या एक मनस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका निरागस मुलाची फेव्हरेट टीचर न आल्याने त्याने उदास होत क्लासरुमच्या डेस्कमध्येच बसून राहण्याचे पाऊल उचलले आहे. तर दुसऱ्या शिक्षिकेने या मुलाला पाहिल्यावर त्याचा व्हिडिओ तयार करत काय झाले अशी विचारणा केली, या मुलाने ममता मॅम यांना मिस करत असल्याचे उत्तर दिले होते. याचमुळे ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10.1 दशलक्ष ह्यूज आणि 10 लाख लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. आर्ट टीचर नावाने हा व्हिडिओ शेअर करत ‘ममता मॅडमची आठवण येत आहे’ अशी कॅप्शन दिली आहे. आता या व्हिडिओला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात येत आहे. तसेच यावर कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे. याला म्हणतात विद्यार्थी अन् शिक्षकामधील बाँडिंग असे एकाने नमूद केले आहे. तर अन्य युजर्सनी आम्हाला अशी शिक्षिका का मिळाली नाही अशी मजेशीर कॉमेंट केली आहे.
या व्हिडिओत क्लासरुममधील डेस्कच्या आत बॅग ठेवण्याच्या जागी मुलगा बसल्याचे दिसून येते. अन्य मॅडम येतात आणि या मुलाचा हात पकडून त्याला डेस्कमधून बाहेर काढतात. मग मुलाचे डोळे पाणावतात. मॅडम या मुलाला काय झाले अशी विचारणा करतात. मग तो मुलगा ममता मॅमची आठवण येतेय असे उत्तर देत असल्याचे दिसून येते. आता सोशल मीडियावर ही ममता मॅम कोण असा प्रश्न विचारला जात आहे.









