‘आप’च्या उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचा सल्ला
प्रतिनिधी /मडगाव
म्हादईच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी ती विकू देणार नाही असे सांगितले होते. पण त्यांनी यासंदर्भात काहीच का केले नाही, असा सवाल आम आदमी पक्षाच्या उपाध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री असलेले श्रीपाद नाईक यांनी आताच या प्रश्नावरून राजीनामा द्यावा. कारण केंद्र सरकारचे मंत्री असताना म्हादई प्रश्नावर त्यांना बाजूला ठेवले आहे, असे कुतिन्हो म्हणाल्या.
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वर्षाच्या समाप्तीस धरून आम आदमी पक्षाच्या दक्षिण गोवा गटाने अनेक द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली. भ्रष्टाचार थांबवा आणि पायाभूत साधनसुविधांमध्ये सुधारणा करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. करदात्यांचे पैसे विनाकारण खर्च केले जात असून सरलेल्या वर्षाकडे आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा गोव्यासाठी चांगल्या अशा आठवणी दिसत नाहीत. मोपा विमानतळ, नवीन झुआरी पुलापासून म्हादईपर्यंतच्या मोठय़ा विषयांच्या बाबतीत हे सरकार भ्रष्टाचारात गुंतलेले आहे, असा आरोप कुतिन्हो यांनी केला.
पक्षाचे सहसचिव अभिजित देसाई म्हणाले की, गोमंतकीयांनी आपण काय साध्य केले याचा विचार केला पाहिजे. आरोग्य सुविधा, बेरोजगारी आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल झालेला दिसत नाही. विशेषतः अनुदानित शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे अजूनही तशीच आहेत. कोविडच्या काळात अनेक समस्या दिसून आल्या होत्या. त्या सुधारायला हव्या होत्या. पण त्यातही सुधारणा दिसून येत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आयसीयू आणि डायलिसिस सेंटर उभारले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप तसे काहीच झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.









