ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना विसकळीत झाली आहे. त्यामुळे पुन्हा बांधणी करण्यासाठी शिवसेना (Shivsena) प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच यावेळी व्यासपिठावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची जागा मोकळी होती. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला. केंद्र सरकार नेहमीच मुंबईला मदत करतं, यांना माहित नाही. कधी वाचत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास यांनी कधी वाचला नाही. यांना कस कळणार, केंद्र सरकारने मुंबईसाठी काय दिलं. उद्धव ठाकरे हा जगातील सर्वात ‘ढ’ माणूस असून आयत्या बिळावर नागोबा असल्याचं नारायण राणे म्हणाले.
हे ही वाचा : ‘उद्या तुमचीपण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा’; संदीप देशपांडेंचं ट्विट
“अमित शाह (Amit Shah) हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांना जमिन दाखवा असे म्हणले होते. पण अमित शाहांचा बोलण्याचा अर्थ यांना कळला नाही. त्यांना जमिनीवर या असे म्हणायचे होते. आता म्हणताहेत आसमान दाखवू. कोणाच्या जीवावर आसमान दाखवू बोलत आहात उद्धव ठाकरे. शिवसेनेचा जन्म झाला 19 जून 1966 तेव्हा तुम्ही 6 वर्षांचे होता. तेव्हा तुम्ही कुठेच नव्हता. तुम्ही 39 व्या वयात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा तुम्ही राजकारणात आलात. त्याच्याआधी तुम्ही शिवसेनेत सक्रिय नव्हते. बरीच आंदोलने झाली तेव्हा तुम्ही कुठे होता. आतापर्यंत कोणाच्या कानशिलात लगावली”, असे नारायण राणे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा असल्याचं नारायण राणे म्हणाले. ते म्हणाले की, “शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सहा वर्षाचे होते. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते राजकारणात सक्रिय झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटी तरी मारला का? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, थेट मुख्यमंत्री झाले. शिवसेना घडायला, वाढायला, सत्तेवर यायला शिवसैनिकांचा त्याग आहे, यामध्ये उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही. दूध पाजले म्हणता, मग सत्तेत असताना खोक्यांच्या रुपात तूप कोण खाल्लं? यशवंत जाधव यांनी याआधी ते सांगितलं होतं.”