सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृह वारंवार तहकूब
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमान केल्याचा आरोप करीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसने अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दोन्ही सभागृहात बाबासाहेबांचे फोटो दाखवत भाजपला बाबासाहेब, संविधानाचे काही देणेघेणे नाही, अशी टीका करण्यात आली. या मुद्द्यावर दिवसभर झालेल्या खडाजंगीमुळे तब्बल तीन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. गुरुवारी सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. लगेच प्रश्नोत्तरांचा तास घेण्यात आला. त्यानंतर आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी बाळंतिणींच्या मृत्यू प्रकरणाबद्दल विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर दिले. त्यानंतर लगेच सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू पेली. भाजप नेत्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात करताच सभागृहात गदारोळ सुरू झाला.
काँग्रेसचे मंत्री, आमदारांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो होते. याचवेळी भाजपचे आमदार गुरुराज गंटीहोळी यांनीही बाबासाहेबांचा एक फोटो आपल्या हातात घेऊन काँग्रेसविरुद्ध घोषणा सुरू केली. मंत्री भैरती सुरेश यांनी बाबासाहेबांचे फोटो हातात घ्यायला तुला लाज वाटत नाही का? अशा शब्दात त्यांना खडसावले. गदारोळ वाढताच सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी 11.10 वाजण्याच्या सुमारास कामकाज तहकूब केले. तहकूब केल्यानंतरही दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरूच होती.
दुपारी 1.29 वाजता तब्बल 2 तास 20 मिनिटांनी कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी भारतमाता की जय, जय भीमच्या घोषणा सुरू झाल्या. बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल चर्चेला परवानगी द्या, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनीही हातात बाबासाहेबांचे फोटो धरून भाजपविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या आमदारांनीही काँग्रेसचा धिक्कार असो अशा घोषणा सुरू झाल्या. दोन्ही बाजूने गदारोळ वाढताच भाजपने कागदांचे तुकडे फाडून सभाध्यक्षांच्या आसनासमोर टाकण्यास सुरुवात केली. त्यावेळी 1.43 वाजता पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले.
दहा मिनिटांनी कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत या घटनेसंबंधी विधानसभेत माहिती दिली. केंद्रीयमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य साऱ्या देशाने ऐकले आहे. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल भाजपच्या अंतरंगात कोणती भावना आहे, हे उघड झाले आहे. जीवनात एकदा तरी केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या मनातील सत्य बोलून दाखवले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजप, संघाविरुद्ध टीका केली. पुन्हा गदारोळ वाढताच सभाध्यक्षांनी भोजन विराम जाहीर केला.
तरुणपिढीला प्रेरणादायी
भोजन विरामानंतर कायदामंत्री एच. के. पाटील यांनी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात विधानसभेत अधिकृत निर्णय मांडले. शतकमहोत्सवाचे कार्यक्रम तरुणपिढीला प्रेरणादायी ठरो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पक्षभेद विसरून आमदारांना निधी
मतदारसंघांच्या विकासासाठी सरकारकडून पुरेसे निधी उपलब्ध होत नाही, असा आरोप भाजपचे सुनीलकुमार व इतर आमदारांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान केले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या चर्चेला उत्तर दिले असून निधीची कमतरता नाही. रस्ते, घरे बांधण्यासाठी पुरेसे निधी देण्यात आले आहे. गॅरंटी योजनांचा विकासकामावर परिणाम झाला नाही. बेंगळूरला विशेष अनुदान देण्याचे जाहीर करतानाच अपेंडिक्स ई योजनेतून चार हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे. ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पक्षभेद विसरून सर्व आमदारांना निधी दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









