पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथील घटना ः तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर संशय
@ वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी केंद्रीय गृह, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. कूचबिहारच्या दिनहाटा भागात पक्ष कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना हा हल्ला झाला. हल्लेखोर तृणमूल काँग्रेस समर्थित असल्याचा आरोप त्यांनी केला. टीएमसी कार्यकर्त्यांनी निशीथ प्रामाणिक यांच्या ताफ्याला रोखत त्यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी केल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी मंत्री रस्त्याच्या मधोमध उभे असून त्यांच्याभोवती घोषणाबाजी होत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. याप्रसंगी तेथे उपस्थित पोलिसांनी जमावाला पांगविले. यापूर्वी बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला होता. कुशवाह बक्सरहून पाटण्याला परतत असताना काही लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची घटना घडली होती.









