नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयाच्या नूतन वास्तूची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी, पेटाळा मैदानावरील नियोजनाची घेतली माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी 19 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या नागाळा पार्क येथील नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मंत्री शहा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा प्रवासी योजनेंतर्गत बैठकीला जिल्ह्यातील 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळांची पाहणी केली. पेटाळा येथील मैदानावर न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमाला गृहमंत्री शहा रविवारी, 19 रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने मंडप उभारणीचे काम सुरू आहे. त्याच्याशी निगडीत काही सुचना त्यांनी पोलीस प्रशासन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, सायंकाळी मंत्री पाटील यांनी नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयाच्या नियोजित इमारतीची पाहणी केली. त्यांनी रविवारी सायंकाळी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून 10 हजार भाजप पदाधिकारी उपस्थित राहतील. यावेळी गृहमंत्री शहा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती दिली. पाहणीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडीक, नाना उर्फ सत्यजित कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, विजय जाधव, डॉ. राजवर्धन, अशोक देसाई, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, हेमंत आराध्ये, विजय आगरवाल, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.