हैदराबाद मुक्ती दिन कार्यक्रमात घेतला भाग
वृत्तसंस्था/ हैदराबाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ‘हैदराबाद लिबरेशन डे’ कार्यक्रमात भाग घेतला आहे. हैदराबाद येथील परेड ग्राउंडमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाह यानी लिबरेशन डे साजरा न केल्याप्रकरणी जुन्या सरकारांना निशाणा साधला आहे.
मागील 75 वर्षांमध्ये कुठल्याही सरकारने ‘हैदराबाद लिबरेशन डे’ साजरा केला नाही. तुष्टीकरण आणि मतपेढीच्या राजकारणामुळे जुनी सरकारं हा दिन साजरा करण्यास घाबरत होती. इतिहासापासून तोंड फिरविणाऱ्यांपासून देशाची जनताही तोंड फिरवत असल्याचे म्हणत शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
सरदार पटेल आणि के.एम. मुन्शी यासारखे नेते हैदराबादला निजामापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी जबाबदार आहेत. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर 399 दिवसांपर्यंत हैदराबादवर क्रूर निजामाने राज्य केले. हे दिवस लोकांसाठी अत्यंत त्रासदायक होते. सरदार पटेलांनी 400 व्या दिवशी हैदराबादला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली. याकरता अनेक संघटनांनी देखील संघर्ष केला. तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकातील लोकांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नये असे शाह म्हणाले.
17 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्यासोबतच्या 5 दिवसांच्या युद्धानंतर हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खानने शरणागती पत्करली होती. यानंतर हैदराबाद हे संस्थान भारतात विलीन झाले होते. हैदराबादच्या विलीनीकरणाला रविवारी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा केला आहे. याचबरोबर काँग्रेस ‘विलय दिन’ तर बीआरएसकडुन ‘राष्ट्रीय एकता दिन’ अणि एआयएमआयएमकडून ‘कौमी एकता दिन’ आयोजित करण्यात आला.