मंत्री सुभाष फळदेसाईंनी दिल्लीत घेतली भेट नड्डांकडून राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक
सांगे : राज्य सरकारचे समाजकल्याण व दिव्यांग सक्षमीकरणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी राज्य दिव्यांग आयोगाचे सचिव ताहा हाझिक यांच्यासह नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन त्यांना गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान मंत्री फळदेसाई यांनी नड्डा यांना पर्पल फेस्टच्या मागील दोन आवृत्त्यांच्या प्रभावी उपक्रमांची आणि परिणामांची माहिती दिली. हा कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी समर्पित आहे, असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांनी पर्पल फेस्टच्या बॅनरखाली राबविण्यात आलेले विविध समावेशक उपक्रम, सामुदायिक सहभाग कार्यक्रम आणि धोरणाच्या अनुषंगाने राबविलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.
गोवा सरकारची वचनबद्धता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने प्रभावित होऊन नड्डा यांनी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या अनुकरणीय कार्याची प्रशंसा केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, 2025 मध्ये सहभागी होण्यास उत्सुकता दर्शविली आणि दिव्यांगांच्या समावेशाच्या बाबतीत एक उदाहरण स्थापित करण्याच्या राज्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे फळदेसाई यांनी सांगितले. नड्डा यांनी गोव्यात दिव्यांग व्यक्तींसाठी अनुकूल पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्यकेंद्रीत उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या विभागांमध्ये समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. गोवा सरकार पर्पल फेस्ट, 2025 ला जागतिक व्यासपीठ बनवण्यास वचनबद्ध आहे असेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले.









