बेळगाव : माळमारुती स्पोर्ट्स क्लब आयोजित आठव्या माळमारुती चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने टिळकवाडी क्रिकेट क्लबचा 31 धावांनी पराभव करत माळमारुती चषक पटकावले. राहुल नाईक सामनावीर तर रोहीत पोरवालला मालिकावीराने गौरविण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर आयोजित उपांत्य लढतीत युनियन जिमखाना संघाने के. आर. शेट्टी किंग्ज संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 8 गडीबाद 162 धावा केल्या.
त्यात कर्णधार राहुल नाईकने 30 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 64, प्रसाद नाकाडीने 2 चौकारांसह 24, मिलिंद चव्हाणने 1 चौकार 1 षटकारांसह 16, विनीत अडुरकरने 1 चौकार 1 षटकारसह 15 धावा केल्या. टिळकवाडी क्लबतर्फे ओमकार चव्हाणने 3, रवी पिल्लेने 2, प्रितेश भातकांडे व रोहित दोडवाड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी क्लब संघाचा डाव 18.5 षटकात 131 धावात आटोपला. त्यात शिवम यादवने 4 चौकार, 2 षटकारांसह 35, शिवराज तांडेलने 20, अभिषेकने 14 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे रोहित पोरवालने 3, शुभम भादवणकर व रोहित देसाई यांनी प्रत्येकी 2 तर कर्णधार राहुल नाईक यांनी एक गडी बाद केला. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार राहुल नाईक, उत्कृष्ट फलंदाज क्लबचा शिवम यादव तर स्पर्धा मालिकावीर पुरस्कार युनियन जिमखानाच्या रोहित पोरवाल यांना देण्यात आले.









