बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून टिळकवाडी कोचिंग क्लब संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा 196 धावांनी तर युनियन जिमखाना संघाने रॉजर क्रिकेट क्लबचा 9 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी चार गुण मिळविले. अतित भोगण, समर्थ कोकणे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिळकवाडी कोचिंग अकदमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी बाद 211 धावा केल्या. यामध्ये समर्थ कोकणेने 8 चौकारासह नाबाद शतक झळकविले. सिद्धार्थ हेडाने 4 चौकारासह 48, अथर्व कुलकर्णीने 17 धावा केल्या.
बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी तर्फे दिनेशकुमार, विनय व विवेकानंद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा डाव 5.5 षटकात 15 धावांत आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. टिळकवाडीतर्फे सिद्धार्थ हेडाने 11-4, समर्थ कोकणेने 4-3 गडी बाद केले. केएससीए ऑटोनगर येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्वगडी बाद 26 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. युनियन जिमखानातर्फे अतित भोगणने 9 धावांत 5, ओमकार चौगुलेने 5 धावांत 3, आरुश व मीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 5 षटकात 1 गडी बाद 29 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात अनिश तेंडुलकरने नाबाद 10 तर कृष्णा करोशीने नाबाद 8 धावा केल्या. रॉजरतर्फे श्रीनिवास पाटीलने 1 गडी बाद केला.









