केएससीए 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिळकवाडी सीसी संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा तर युनियन जिमखाना अ संघाने रॉजर क्रिकेट क्लबचा पराभव प्रत्येकी चार गुण मिळविले. अतित भोगण, समर्थ कोकणे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए ऑटोनगर येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लब अ ने प्रथम फलंदाजी करत 25 षटकात सर्व गडीबाद 26 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. जिमखानातर्फे अतित भोगणने 9 धावात 5, ओमकार चौगुलेने 5 धावात 3 तर आरुष व मीर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 5.2 षटकात 1 गडी बाद 29 धावा करून सामना नऊ गड्यांनी जिंकला. त्यात अन्वीश तेंडुलकरने 10, कृष्णा करोशीने नाबाद 8 धावा केल्या. रॉजरतर्फे श्रेयस पाटीलने एक गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी कोचिंग संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी बाद 211 धावा केल्या. त्यात समर्थ कोकणेने 8 चौकारासह नाबाद 108 धावा दमदार शतक झळकविले. त्याला सिद्धार्थ हेगडे 4 चौकारासह 48, अतित कुलकर्णीने 17 धावा करून सुरेख साथ दिली. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेश कुमार, विनय वड्डर, विवेकानंद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा डाव 5.5 षटकात 15 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. टिळकवाडीतर्फे समर्थ कोकणेने 4 धावात 3, सिद्धार्थ हेडाने 11 धावात 4 गडी बाद केले.









