बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखानाने चॅलेंजर युथ स्पोर्ट्स क्लबचा 90 धावांनी तर सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबने विजय क्रिकेट अकादमीचा 19 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. मिलिंद चव्हाण, मंगेश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात सर्वगडी बाद 206 धावा केल्या. मिलिंद चव्हाणने 3 षटकार, 7 चौकारासह 49, सुमित भोसलेने 5 चौकारासह 41, शुभम भादवणकरने 1 षटकार 4 चौकारासह 36, राहुल नाईकने 18 धावा केल्या.
चॅलेंजरतर्फे गोविंद एम.डी. 41 धावांत 5, प्रथमेश लोहारने 18 धावांत 3 तर अनिकेत लोहारने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजरचा डाव 24.3 षटकात 116 धावांत आटोपला. शुभम चव्हाण 34, ओम माटीवड्डरने 22 धावा केल्या. जिमखानातर्फे विनीत आडुरकरने 21-3, मिलिंद चव्हाणने 13-2, अनिल गवीने 6-2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 27 षटकात सर्वगडी बाद 187 धावा केल्या. त्यात मनोज पाटीलने 37, मंगेशने 33, सुरज तलवारने 24 तर रामनाथ काळेने 18 धावा केल्या. विजय अकादमीतर्फे लोहीत कामानाचे 37-3 तर नमन ओऊळकर, चंदन कुंदरनाड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजय अकादमीने 30 षटकात 9 गडीबाद 173 धावा केल्या. रघुवीर एस.आर.ने 55, नमनने 41 तर लक्ष शहाने 20 धावा केल्या. सिग्नीचरतर्फे भरत गाडेकर, रामनाथ काळे, मनोज पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









