दिल्लीत जोरदार सज्जता : मित्रपक्षांच्या 5 ते 6 मंत्र्यांचा समावेश शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या बुधवारी होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने दिल्लीत जोरदार सज्जता करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पण सर्व संकेत ही शक्यता स्पष्ट करीत आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्तार करण्याची योजना सज्ज केली असून मित्रपक्षांच्या 5 ते 6 मंत्र्यांचा समावेश विस्तारात होण्याची शक्यता आहे. भाजपच्या काही मंत्र्यांना पक्षकार्यासाठी मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि इतर नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांचा उद्देश या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करणे, हाच होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांनाही पक्षकार्यासाठी घेतले जाणार आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. नुकतीच भाजपने चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्त केली आहे. त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची अटकळ बांधली जात आहे. तेलंगणातील भाजप नेते आणि केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे त्या राज्याचे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आल्याने त्यांनी मंत्रीपद सोडले आहे. आता आणखी काही मंत्र्यांना पद सोडून पक्षकार्यासाठी घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सीतारामन यांच्या संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो, हे येत्या दोन दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे.
पुढील आठवड्यात रालोआची बैठक
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोआ) बैठक येत्या 18 जुलैला आयोजित केली आहे. या बैठकीच्या आधीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली गेल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. जनतेच्या संपर्कात असणारे आणि मतदारांवर प्रभाव असणारे नेते मंत्रिमंडळात समाविष्ट केले जातील, अशींही माहिती देण्यात येत आहे.
संभाव्य चेहरे
मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. नव्या अर्थमंत्र्यांची नियुक्ती केली गेल्यास हा विस्तार अत्यंत महत्वाचा ठरु शकतो. येत्या 10 महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. याच्याआधी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या असून त्यांना मध्यवर्ती मानूनच हा विस्तार केला जाणार हे निश्चित आहे. तसेच हा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार असण्याचीही शक्यता आहे. दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होत आहे.
उत्सुकता शिगेला
ड लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने उत्सुकता शिगेला
ड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पद सोडणार का, हा चर्चेचा विषय
ड भाजप मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात अधिक स्थान देण्यासाठी प्रयत्नशील









