निवडणूक आचारसंहितेमुळे तात्पुरता अडथळा : तरीही 68 टक्के कापड पुरवठा
बेळगाव : मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत गणवेश न मिळाल्याने बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी शिक्षण विभागाची हालचाल सुरू आहे. 68 टक्के कापड गोदामांमध्ये उपलब्ध झाले असून उर्वरित कापड मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी 29 मेपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी नोव्हेंबर 2022 मध्येच निविदा काढण्यात आल्या होत्या. राज्यात एकूण 45,511 सरकारी शाळा असून पहिली ते दहावी शिक्षण घेणारे 58.15 लाख विद्यार्थी आहेत. गणवेशासाठी अंदाजे 77.46 कोटी रुपये खर्च येणार असून यातून कापड खरेदी केली जाणार आहे. मागील शैक्षणिक वर्षात शालेय पाठ्यापुस्तकांसोबतच गणवेश वितरणाचा गोंधळ उडाला होता. वर्ष संपत आले तरी गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. काही सरकारी शाळांना शैक्षणिक वर्ष संपताना गणवेशाचे वितरण करण्यात आले. यामुळे यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचा पुरवठा करण्यासाठी चार कंपन्यांना निविदा देण्यात आल्या आहेत. या कंपन्यांकडून त्या त्या शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये कापड पुरवठा केला जाणार आहे. एकूण 1.28 कोटी मीटर कापड खरेदीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु, सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक अडचणी येत असून मेच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत कापड पुरवठा पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश वितरण होणार
यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2022 मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक शैक्षणिक विभागापर्यंत कापड पुरवठा सुरू असून शाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश वितरण केले जाणार आहे.
-डॉ. आर. विशाल, आयुक्त, सार्वजनिक शिक्षण विभाग.









