केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी घेतली भेट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहिता लागू होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत उत्तराखंड युसीसी मसुदा समितीच्या सदस्यांची बैठक झाली आहे. बैठकीत समान नागरी संहितेचा अंतिम अहवाल आणि तो लागू करण्यावरून चर्चा झाली आहे. याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही शाह यांची भेट घेत चर्चा केली आहे. उत्तराखंड समान नागरी संहिता मसुदा समितीचा अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये सोपविला जाऊ शकतो. यानंतर हा अहवाल विधानसभेत मांडला जाईल आणि त्याला कायद्याचे स्वरुप प्राप्त करून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. उत्तराखंडच्या धर्तीवरच देशाची समान नागरी संहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह हे 7 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून यात निवडणुकीची तयारी तसेच रणनीतिवर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपचे नेते मनवीर चौहान यांनी दिली आहे.
युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन तज्ञांच्या समितीचा कार्यकाळ राज्य सरकारने अलिकडेच तिसऱ्यांदा वाढविला होता. समितीचा कार्यकाळ 27 सप्टेंबर रोजी समाप्त होणार होता. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन 5 सदस्यीय समितीने अद्याप स्वत:चा अहवाल राज्य सरकारला सोपविलेला नाही. समितीच्या प्रमुख आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांनी मसुदा तयार केला जात असून समितीचा अहवाल लवकरच राज्य सरकारला सोपविण्यात येईल अशी माहिती दिली होती. राज्य सरकारने मागील वर्षी 27 मे रोजी युसीसी संबंधी पाच सदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली होती.
भाजपकडून आश्वासन
मागील वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. राज्य सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसाठी तज्ञांच्या एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.









