पिता बेपत्ता, तारीपांटो सांगेतील दुर्घटना
सांगे : तारीपांटो सांगे येथील पुलावरुन चारचाकी कार नदीत कोसळल्याने कुयणामळ, मारंगण सांगे येथील रेखा नाईक व तिचा मुलगा देवांश (2 वर्षे) यांचा दुर्देवी मृत्यू होण्याची घटना काल सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. रेखाचे पती मिलींद नाईक हे बेपत्ता आहेत. निळ्या रंगाची जी ए 01 – आर – 9158 क्रमांकाची ही झेन कार सांगेच्या दिशेने येत होती. त्यावेळी ती सरळ नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधकार्य सुऊ केले. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. घटनेनंतर तीन तासपर्यंत कारमधील व्यक्ती कोण, कुठल्या याची काहीच माहिती मिळू शकली नव्हती. गावचे नागरिक रोहित नाईक यांनी पाण्याखाली गेलेल्या गाडीचा शोध लावला. मात्र गाडी पाण्यात असल्यामुळे कारमधील माणसांना पाण्याबाहेर काढता आले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी पोलीस आणि लोकांच्या मदतीने पाण्यात पडलेली कार रात्री दहा वाजता क्रेनच्या मदतीने वर काढली. रेखा व देवांश यांचे मृतदेह सापडले.
अपघातस्थळ बरेच धोकादायक
कार नदीत पडल्यानंतर स्थानिक लोकांना मोठा आवाज ऐकू आला. जेथे कार कोसळली तो भाग धोकादायक असून बराच खोल आहे. त्यामुळे दूरवरून काही कळत नाही. शिवाय पुलाला कठडे नाहीत. जवळच विजेचा खांब आहे. त्याचबरोबर पाण्याचे खुले चेंबरही तेथेच आहे. हे सगळे अडथळे चुकवत असतानाह कार थेट नदीत जाऊन कोसळली. सांगे अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी दामोदर जांबावलीकर यांनी आपल्या टीमसह शोधमोहीम राबविली. घटनास्थळी सांगेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस, कुडचडेचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक हजर होते.









