आंघोळ करताना कॅनॉलमध्ये बुडून , तोरणगट्टीजवळील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
कॅनॉलमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील तोरणगट्टीजवळ असलेल्या मोठ्या कॅनॉलमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली असून गुरुवारी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. कॅनॉलमध्ये बुडालेले दोघे ऊस तोडणी मजूर होते. प्रकाश शारदा बडकलूर (वय 22, रा. तोरणगट्टी, ता. रामदुर्ग) व विठ्ठल बसवराज मादर (वय 18, रा. कटमळ्ळी, ता. सौंदत्ती) अशी दुर्दैवींची नावे आहेत. त्यांना पोहता येत नव्हते. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून कटकोळ पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश व विठ्ठल दोघे ऊसतोडणी मजूर आहेत. विठ्ठल हा मूळचा कटमळ्ळीचा. सध्या तोरणगट्टी येथे त्याचे वास्तव्य होते. हे दोघे अन्य काही मित्रांसमवेत बुधवारी दुपारी आंघोळीसाठी तोरणगट्टीजवळील मोठ्या कॅनॉलला गेले. थोड्यावेळात प्रकाश व विठ्ठल कॅनॉलमधील पाण्यात वाहून गेले.
कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली. कटकोळ पोलिसांनाही ही घटना कळविण्यात आली. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मंडल पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, कटकोळचे पोलीस उपनिरीक्षक एस. पी. उन्नद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कॅनॉलमध्ये बुडालेल्या दोघा जणांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. बुधवारी दिवस मावळल्यानंतर प्रयत्न बंद करण्यात आले. गुऊवारी सकाळी मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले. सकाळी 11 वाजता प्रकाशचा मृतदेह चिलमूरजवळ आढळून आला. तर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास कटकोळजवळ विठ्ठलचा मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. जलचरांनी खाल्ल्यामुळे प्रकाश व विठ्ठल या दोघांचे चेहरे विद्रुप झाले होते.









