सिझेरियननंतर संशयास्पद मृत्यू झाल्याची पोलिसांत नोंद : मुलीला दिला जन्म
बेळगाव : सिझेरियननंतर बाळंतिणीचा सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 5 च्या दरम्यान घडली आहे. अंजली निंगाणी पाटील (वय 31 रा. तानाजी गल्ली, निलजी) असे तिचे नाव असून बाळंतिणीच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी प्रसूतीगृहासह शवागाराबाहेर आक्रोश करत निदर्शने केली. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी अंजली यांची आई वासंती बाळू चिक्कलकर (रा. अलतगा) यांनी आपल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची फिर्याद एपीएमसी पोलीस ठाण्यात दिली आहे. अंजली हिचे माहेर अलतगा असून गेल्या 13 वर्षांपूर्वी तिचा निलजी येथील निंगाणी यांच्यासोबत विवाह झाला होता. 13 वर्षांनंतर अंजली या गर्भवती राहिल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना 22 जानेवारी रोजी प्रसूतीची तारीख दिली होती. मात्र सोमवारी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात सायंकाळी 6 वाजता दाखल करण्यात आले. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने डॉक्टरांनी रात्री 10 च्या दरम्यान सिझेरियन केले. त्यावेळी अंजली यांनी मुलीला जन्म दिला. मात्र मध्यरात्रीनंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. ही माहिती नातेवाईकांनी त्याठिकाणी असलेल्या डॉक्टर व परिचारिकांना दिली.
मात्र कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पहाटे पाचच्या दरम्यान अंजलीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांनी प्रसूतीगृहात एकच आक्रोश केला. ही माहिती समजताच अंजलीच्या माहेरचे आणि सासरचे लोक सिव्हिल हॉस्पिटल आवारात जमा झाले. तिच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला. संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी, यासाठी शवागाराबाहेर ठिय्या आंदोलन केले. ही माहिती समजताच एपीएमसी पोलिसांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांची समजूत काढत शांत राहण्याचे आवाहन केले. याप्रकरणी अंजलीच्या आई वासंती बाळू चिक्कलकर यांनी आपल्या मुलीचे सिजेरियन झाल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला, अशी तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात गर्भवती, बाळंतिणी, नवजात शिशूंचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी बिम्स प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यासह लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू नव्हे : डॉ. अशोककुमार शेट्टी
या घटनेनंतर बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी प्रसूतीगृहाला भेट देऊन डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप फेटाळून लावला. यावेळी डॉ. शेट्टी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, 40 आठवड्यांची गरोदर असताना अंजलीला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसूतीतज्ञांनी तिची तपासणी केली असता ही उच्च जोखमीची गर्भधारणा असल्याचे समजले. त्यामुळे तातडीने सिझेरियनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. त्यावेळी अंजलीला फिट्स आल्याने रक्तदाब कमी झाला. अॅम्नीयोटीक फ्ल्यूड एम्बालिसम असल्याचा संशय आला आणि सकाळी तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांचा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा यात नव्हता. सिव्हिलमध्ये दरवर्षी 10 हजार प्रसूती होतात. त्यापैकी 40 टक्के सिझेरियन आहेत. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतून सर्वाधिक जोखमीचे असलेले रुग्ण सिव्हिलमध्ये येतात. अॅम्नीयोटीक फ्ल्यूड एम्बालिसम आढळून आल्यास ते कोणाच्याही हातात नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बाळाला ठेवले अतिदक्षता विभागात
लग्नानंतर तब्बल 13 वर्षांनी अंजली गर्भवती राहिली होती. सिझेरियननंतर तिने जन्म दिलेल्या मुलीला अतिदक्षता विभागात देखरेखखाली ठेवण्यात आले आहे. मात्र पती, मुलगी व कुटुंबीयांना सोडून अंजली या जगातून निघून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. एक दिवसाच्या त्या बाळावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे उपचार देण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
सरकार सिव्हिल हॉस्पिटलला योग्य त्या सुविधा पुरवत नाही
पुन्हा एकदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळंतिणीचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस सरकार सिव्हिल हॉस्पिटलला योग्य त्या सुविधा पुरवत नसून कोणतेही खबरदारीचे उपाय अंमलात आणत नाही. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून आजपर्यंत ज्या-ज्या बाळंतिणींचे मृत्यू झाले आहेत, त्या सर्वांना न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहोत. शिवाय या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत.
– डॉ. सोनाली सरनोबत










