बकरी धुण्यासाठी गेल्याने घडली दुर्घटना
बेळगाव : कुरबरहट्टी-धामणे एस. येथील एका मेंढपाळ मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी ही घटना घडली असून शुक्रवारी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. धर्मेंद्र कल्लाप्पा सायबण्णावर (वय 16) रा. हालसिद्धेश्वर गल्ली, कुरबरहट्टी असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. धर्मेंद्र व त्याचा भाऊ हालाप्पा या दोघांनी गुरुवारी बकरी चरायला सोडली होती. यरमाळजवळील चिरकीमाळकडे गेले असता दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास दोन बकरी धुण्यासाठी धर्मेंद्र खाणीत घेऊन गेला होता. त्याचवेळी बकरी धुताना पाय घसरून खाणीत साचलेल्या पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस व स्थानिक नागरिकांनी एचईआरएफ पथकातील कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. अग्निशमन दलाच्या जवानांनाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी धर्मेंद्रचा मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.









