नव्या बांधकामावर विजेच्या धक्क्याने गेले बळी : शाहूनगर येथील घटनेने हळहळ : चौघा जणांविरुद्ध एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघा जणांचा बळी गेला. शनिवारी सकाळी शाहूनगर येथे ही घटना घडली असून मृतांत आजी, आजोबा व नातीचा समावेश आहे. नव्या बांधकामस्थळावर ही घटना घडली असून याप्रकरणी बांधकामाच्या मालकासह तिघा जणांविरुद्ध दुर्लक्षाचा ठपका ठेवून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार अनिल बेनके, पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे प्रभारी एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी आदी राजकीय नेते व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हिराप्पा गणकाप्पा लमाणी ऊर्फ राठोड (वय 50), त्यांची पत्नी शांतव्वा हिराप्पा लमाणी ऊर्फ राठोड (वय 48), त्यांची नात अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमाणी ऊर्फ राठोड (वय 8) तिघेही मूळचे राहणार अरिबेंची तांडा, ता. रामदुर्ग, सध्या रा. शाहूनगर अशी त्या दुर्दैवींची नावे आहेत. शनिवारी सकाळी 6 ते 6.30 या वेळेत ही घटना घडली असून घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
घटनास्थळावरून उपलब्ध माहितीनुसार हिराप्पा व शांतव्वा हे दांपत्य शाहूनगर येथील शिवालयापासून जवळच सुरू असलेल्या एका नव्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करीत होते. शुक्रवारी त्यांची नातही त्यांच्याकडे रहायला आली होती. शनिवारी सकाळी हे कुटुंबीय रहात असलेल्या शेडसमोर पडलेल्या एका लोखंडी पाईपमुळे विजेचा धक्का बसला. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा बळी गेला.
सुरुवातीला आठ वर्षाच्या अन्नपूर्णाला लोखंडी पाईपचा स्पर्श झाला. विजेचा धक्का बसताच तिने आरडाओरड सुरू केली. तिची आरडाओरड ऐकून आजोबा हिराप्पा तिला वाचवायला गेले व या दोघा जणांना वाचविण्यासाठी शांतव्वा पुढे सरसावल्या. असुरक्षित साधनांमुळे विजेचा धक्का बसून तिघा जणांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच शेजारी या घराकडे धावले. एपीएमसी पोलीस व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

नवे बांधकाम व त्याला लागूनच असलेल्या शेडच्या मध्ये तिन्ही मृतदेह पडले होते. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तीनही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आले. तत्पूर्वी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केल्याशिवाय आम्ही मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सायंकाळी तीनही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी व शवागाराबाहेर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जादा कुमक तैनात करावी लागली. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा बळी गेल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यावेळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी या घटनेला बांधकामाचे मालक, कंत्राटदार व हेस्कॉम अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा कारणीभूत ठरला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई
महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याबरोबरच लक्ष्मीताई फाऊंडेशनकडूनही आर्थिक मदत करण्यात आली. घटनास्थळावरूनच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर सरकारकडून भरपाई जाहीर केली.
चौघा जणांवर एफआयआर
शाहूनगर येथील वीज दुर्घटनेसंबंधी तिघा जणांवर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बांधकामाचे मालक सरोजिनी फकिराप्पा नरसिंगन्नवर, कंत्राटदार इनामुल हसन अल्लाउद्दीन जमादार, हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर, लाईनमन आदींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रखवालदाराच्या सुरक्षिततेसाठी बांधकामावर कोणतीही उपाययोजन करण्यात आली नव्हती. असुरक्षित वीजजोडणीमुळे ही घटना घडली असून पोलिसांनी कंत्राटदाराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.
सुटी घालविण्यासाठी आजी-आजोबाबरोबर
वीज दुर्घटनेत आपल्या आजी-आजोबांबरोबर मृत्युमुखी पडलेली चिमुरडी अन्नपूर्णा ही शुक्रवारी सायंकाळी त्यांच्याकडे रहायला आली होती. अन्नपूर्णाचे आईवडील बॉक्साईट रोडवर एका नव्या इमारतीत वॉचमन म्हणून राहतात. शनिवार-रविवार शाळेला सुटी असल्यामुळे तिला आजीकडे सोडण्यात आले होते. मात्र, विजेच्या धक्क्याने या चिमुरडीचा बळी गेला. तिच्यासोबतच तिचे आजी-आजोबाही दगावले.









