कष्टाने उभारलेली काजूची बाग वाचवण्याचा प्रयत्न बेतला जीवावर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीनजीकच्या हातखंबा तारवेवाडी परिसरात घडलेल्या ह्दयद्रावक घटनेने सारेच हेलावले. मोठ्या कष्टाने तयार केलेल्या काजू बागेला लागलेला वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना गोविंद विश्राम घवाळी (65, हातखंबा तारवेवाडी) या शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागला. त्या उसळलेल्या वणव्यात गंभीर होरपळून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील गोंविद घवाळी यांनी काजूची लागवड केली आहे. त्या बागेत लावलेल्या काजू बागेची देखभाल व पाणी देण्यासाठी गोविंद हे नेहमी जात असत. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे बागेत गेले होते. त्यावेळी काजू बागेशेजारी असलेल्या बागेत गवताला वणवा लागला होता. हा वणवा वेगाने पसरत होता. त्यावेळी वाऱ्याचा वेगही जास्त होता. त्या वाऱ्याबरोबर वणवा गोविंद घवाळी यांच्या बागेकडे सरकला.
यावेळी आपली काजूची बाग वणव्यापासून वाचवण्यासाठी गोंविद यांची धावपळ उडाली असावी. लागती काजू झाडे होरपळतील, यासाठी गोविंद घवाळी यांचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. वाऱ्याच्या वेग व त्यात रणरणत्या उन्हाचा कहर यात वणव्याचा आगडोंब उसळला. त्यातच बागेकडे सरलेला वणवा आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात गोविंद घवाळी गंभीर होरपळले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. वणव्याची बातमी परिसरातील ग्रामस्थांना मिळताच धावाधाव झाली. त्यावेळी गोविंद हे काजूच्या झाडाखाली होरपळून जखमी झाल्याने मृत झाल्याचे पाहून साऱ्यांनाच जबर धक्का बसला. बागेतील काजूच्या झाडाखाली ते मृतावस्थेत होते. तर त्यांच्या चप्पल दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या होत्या. त्यामुळे वणव्यात होरपळल्यानंतर स्वत:ला वाचवण्याचा गोविंद यांनी आटोकाट प्रयत्न केला असावा, असेही बोलले जात आहे. या घटनेची खबर ग्रामीण पोलिसांना महेश गोविंद घवाळी यांनी दिली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर भास्कर सूर्य, हवालदार किशोर जोशी, कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तर घटनेची माहिती मिळताच सरपंच जितेंद्र तारवे, ग्रामविकास अधिकारी दीपक पाल्ये, तलाठी सुविधा वाडकर, पोलीस पाटील शर्वरी सनगरे यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिसांना सहकार्य केले. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. गोविंद घवाळी यांच्या अपघाती मृत्यूने हातखंबा गावावर शोककळा पसरली आहे.









