वार्ताहर/हिंडलगा
मार्कंडेय नदीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दुपारी मण्णूर येथे घडली आहे. आदित्य अनिल चौगुले (वय 21) रा. छत्रपती शिवाजी चौक, मण्णूर असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आदित्य हा रविवारी सुटी असल्याने नेहमीप्रमाणे आपल्या घरातील पाळीव कुत्र्याला घेऊन मार्कंडेय नदीकाठावर पोहण्यासाठी गेला होता. व्यवस्थित पोहता येत नसतानादेखील तो पाण्यात उतरला. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घरातून जाऊन बराच वेळ होऊनदेखील आदित्य परत आला नसल्याने घरच्यांनी नदी काठाकडे धाव घेऊन शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी बंधाऱ्याजवळ त्याचे कपडे आणि दुचाकी लावली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काहीतरी अनर्थ घडल्याचा संशय बळावल्याने ग्रामस्थांनी नदीतील पाण्यात उतरून त्याचा शोध घेतला असता काही वेळाने मृतदेह हाती लागला. याची माहिती गावात समजताच नदीकाठावर ग्रामस्थांची गर्दी जमली होती. तर नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू होता. त्यानंतर दाखल झालेल्या काकती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शवागारात पाठविला. अंत्यविधी आज सोमवारी होणार आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आदित्य हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या अपघाती निधनाबद्दल ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.









