अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीकरांना आश्वासन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीमध्ये सत्तास्थापनेची पुन्हा संधी मिळाली तर, दिल्लीतील बेरोजगारी पाच वर्षांमध्ये संपवून टाकणार, अशी घोषणा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. मुख्य संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात आहे. काँग्रेसही रणमैदानात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. नंतर एका जाहीर सभेतही त्यांनी या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. रोजगार निर्मिती ही माझ्या सरकारची प्राथमिकता राहील. माझे सरकार शक्य तितके रोजगार निर्माण करण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करणार आहे. पाच वर्षांमध्ये दिल्लीत एकही व्यक्ती बेकार राहणार नाही, याची शाश्वती मी देतो. लोकांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
युवकांचा त्रास संपविणार
सुशिक्षित युवक रोजगारासाठी वणवण करताना पाहून मला अतिशय वाईट वाटते. उच्चशिक्षित युवकांनाही रोजगाराविना घरी बसावे लागत आहे. अशा स्थितीत हे युवक वाईट संगतीला लागण्याची आणि गुन्हेगार होण्याची मोठी शक्यता असते. एकदा ते या दुष्टचक्रात सापडले, की त्यांना पुन्हा योग्य वळणावर आणणे अतियश कठीण असते. त्यामुळे त्यांना त्वरित सन्माननीय रोजगार देण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्हाला लोकांनी या कामी सहकार्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी या जाहीर सभेत केले.
अनुभवी सहकारी
माझ्या टीममध्ये अत्यंत अनुभवी सहकारी आहेत. ते रोजगार या विषयातील विशेष तज्ञ आहेत. आम्ही एक योजना सज्ज केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारीचे निर्मूलन केले जाणार आहे. आतिशी मारलेना, मनीष सिसोदिया, गोपाल राय, जस्मीन शहा, राघव च•ा, संजय सिंग, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज इत्यादी माझे सर्व सहकारी रोजगारनिर्मितीचे तज्ञ आहेत. त्यामुळे हे आश्वासन पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि आम्हाला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.









