नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात बेरोजगारी दर 9.22 टक्क्यांवर पोहचला असून तो मार्च महिन्याच्या 8.28 टक्क्यांपेक्षा 0.94 टक्के जास्त असल्याचे दिसून आले आहे. मात्र, ग्रामीण भागात बेरोजगारी दरात घट झाली असून तो एप्रिलमध्ये 7.18 टक्के आहे. मार्चमध्ये ग्रामीण भागात हे प्रमाण 7.29 टक्के होते.
सरासरी बेरोजगारी दर देशात एप्रिल महिन्यात 7.83 टक्क्यांवर पोहचला आहे. तो मार्चमध्ये 7.60 टक्के होता. ही माहिती सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे. मागणीमध्ये घट झाल्याने बेरोजगारी वाढल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने नुकतीच ईपीएफची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार ईपीएफमध्ये 5.18 कोटी नव्या खातेदारांची भर सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत पडली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये 9.34 लाख नव्या कर्मचाऱयांनी ईपीएफमध्ये खाती उघडली आहेत. मात्र जानेवारीत 11.14 लाख कर्मचाऱयांनी खाती उघडली होती. बेरोजगारी संबंधी आकडेवारी या संस्थेच्या वतीने 2018 पासून प्रसिद्ध केली जात आहे.









