महिला, पुरुषांचा बेरोजगारीचा दर झाला कमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमधील बेरोजगारीचा दर 6.8 टक्क्यांवर घसरला आहे.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ऑफिस (एनएसएसओ) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 8.2 टक्के होता. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता. याचे मुख्य कारण म्हणजे देशातील कोविडशी संबंधित अडथळे राहिले असल्याचेही सांगितले आहे.
सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्के होता. त्याच वेळी, एप्रिल-जून 2022 मध्ये तो 7.6 टक्के होता. 18 व्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणनुसार, एप्रिल-जून 2022 मध्ये शहरी भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांमधील बेरोजगारीचा दर 7.6 टक्के राहिला आहे. उपलब्ध डाटा असे दर्शवितो की शहरी भागातील (15 वर्षे आणि त्यावरील) महिलांमधील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च, 2023 मध्ये 9.2 टक्क्यांवर घसरला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 10.1 टक्के होता. त्याच वेळी, पुरुषांमधील शहरी भागातील बेरोजगारीचा दर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सहा टक्क्यांवर घसरला.