एप्रिलमध्ये आकडा 8.11 टक्क्यांवर ः गावांपेक्षा शहरांमधील स्थिती अधिक खराब
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात बेरोजगारी दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीनुसार (सीएमआयई) एप्रिलमध्ये बेरोजगारी दर वाढून 8.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात बेरोजगारी दर 7.80 टक्के राहिला होता. तर फेब्रुवारीमध्ये 7.45 टक्के इतका बेरोजगारी दर होता.
एप्रिलमध्ये शहरातील बेरोजगारी दर 8.51 टक्क्यांवरून वाढत 9.81 टक्के झाला आहे. परंतु एप्रिलमध्ये ग्रामीण बेरोजगारी दरात किंचित घट दिसून आली आहे. हे प्रमाण 7.34 टक्के झाले आहे, एक महिन्यापूर्वी हा आकडा 7.74 टक्के राहिला होता.
एप्रिलमध्ये बेरोजगारी दर 8.11 टक्के राहण्याचा अर्थ काम करण्यास तयार प्रत्येक 1000 व्यक्तींमधील 81 जणांना काम मिळाले नाही. सीएमआयई दर महिन्याला घरोघरी जात सर्वेक्षण करत रोजगाराच्या स्थितीसंबंधी आकडेवारी मिळवत असते. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांद्वारे अहवाल तयार केला जात असतो.









