शिवाजी कागणीकर यांचे प्रतिपादन : लिंगराज कॉलेजमध्ये ‘शाश्वत पर्यावरण विकास’वर परिसंवाद
प्रतिनिधी/ बेळगाव
लिंगराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्यावतीने ‘शाश्वत पर्यावरण विकास’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. प्रारंभी निधी रामनगौडाहट्टी हिने प्रार्थना सादर केली. रोपट्याला पाणी घालून परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. तसनिम पिरजादे यांनी स्वागत केले. या परिसंवादात शिवाजी कागणीकर, प्रा. डॉ. सुमंत हिरेमठ यांनी भाग घेतला. त्यांचा परिचय भूमिका कर्णिग व मोहम्मद शेख यांनी करून दिला.
यावेळी कागणीकर म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करून मानवाचा विकास करणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो विकास टिकावू होणार नाही. भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करायला हवा. डॉ. हिरेमठ यांनी मानव-पर्यावरण संबंध समजून घेण्यात समाजशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरणासमोर उभ्या असणाऱ्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आंतर्विद्याशाखीय सहयोग आणि सर्वांगीण दृष्टिकोन गरजेचा आहे, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन रश्मी बिरादार व प्रीती राजपुरोहित यांनी केले. आभार सौम्या पाटील हिने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. सुस्मिता पुजार यांनी परिश्रम घेतले.









