स्वामी अभेदानंद यांचा उपदेश : ‘गीता में साधक की यात्रा’ यावर व्याख्यान
बेळगाव : जीवनात प्रत्येकाला कोठे ना कोठे पोहोचायचे असते. जीवनयात्रेमध्ये शरीराची यात्रा आपोआप होत जाते. पण आपल्या जीवाची यात्रा नैसर्गिकरीत्या होऊ शकत नाही. त्यासाठी आपली स्वत:ची ओळख आपल्याला निर्माण करावी लागेल. मात्र, त्यासाठी आपल्या वासना, क्रोध कमी होऊन ईश्वरी भक्ती आणि ज्ञानसाधना वाढली का, याचे आत्मपरीक्षण आपल्यालाच करावयाचे आहे. त्यासाठीच गीता समजून घेणे आवश्यक आहे, असा उपदेश स्वामी अभेदानंद यांनी केला.
सर्व जगाचा स्वामी ईश्वर
गीता सत्राअंतर्गत गोगटे कॉलेजमध्ये ‘गीता में साधक की यात्रा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यांनी गीतेचा नववा व अठराव्या अध्यायातील श्लोकांचे दाखले दिले. ते म्हणाले, सर्व जगाचा स्वामी ईश्वर आहे. अंतरयामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरुढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवत सर्वांच्या हृदयात राहिला आहे. म्हणूनच त्याला जगत् अध्यक्ष म्हटले आहे. जगत् अध्यक्ष म्हणजे ईश्वर सर्वव्याप्त आहे. फलाध्यक्ष म्हणजे ईश्वर सर्व कर्मे आणि कर्मफले जाणतो. कर्माध्यक्ष म्हणजे कर्माचा शेवट काय असेल ते फक्त त्याच्याच हातात असते. माझे भक्त माझी भक्ती करून, कीर्तन करून निरंतर संतुष्ट होतात, हे दहाव्या अध्यायात स्पष्ट करण्यात आले आहे. ईश्वर सर्वच ठिकाणी असून जगन्नाथाचा रथ तोच चालवतो, असेही स्वामी म्हणाले. मंगळवारी सकाळी चिन्मय मिशन आश्रमात ‘पूर्णता की अनुभूती कैसी हो’ या विषयावर त्यांनी ‘सत्यम ज्ञानम, अनंत ब्रह्मम’ याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सर्व बदल आणि परिवर्तन यांच्या मागे असणारे अपरिवर्तनीय अधिष्ठान म्हणजे सत्यम होय. ज्ञान हे अनुपाधीत व उपाधीत असे दोन प्रकारचे असते. उपाधीत ज्ञान स्थलपरत्वे व कालपरत्वे बदलत जाते, असे सांगून स्वामींनी वस्तू, ज्ञान आणि ज्ञाता या त्रिपुटीचा उल्लेख केला. ज्ञाता हा कर्ता व भोक्ता बनतो तेव्हा अहंकार निर्माण होतो. ज्ञानामुळे जाणीव वाढते आणि ज्ञान हेच शाश्वत आहे, असे सांगत अनेक उदाहरणांसह स्वामींनी हा विषय सोपा करून सांगितला.









