रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे आयोजन : बेळगावमध्ये पहिल्यांदाच असे भव्य शस्त्रास्त्र प्रदर्शन
बेळगाव : भारताचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्यावतीने आयोजित शिवकालीन भव्य शस्त्रप्रदर्शन व मराठा आरमार प्रदर्शनाचे मंगळवारी दिमाखात उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये शिवकालीन तलवारी, दांडपट्टे, भाले, बाण, साखळदंड, घोड्यांचे नाल, हत्तींचे अंकुश, कुऱ्हाडी, सुरे, कट्यार, बंदुका व ढाली जवळून पाहता येत असल्याने पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला तुफान गर्दी झाली होती. बेळगावमध्ये पहिल्यांदाच असे भव्य शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविण्यात आल्याने शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे.
उद्योजक शिरीष गोगटे यांच्यासह स्वराज्यातील मावळ्यांच्या वारसदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी प्रदर्शनाचे महत्त्व तसेच उद्देश स्पष्ट केला. व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल शरद पै, उपप्रांतपाल अनंत नाडगौडा, हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते तसेच येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक उपस्थित होते.
इव्हेंट चेअरमन अशोक नाईक यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या संस्था तसेच व्यक्तींचे आभार मानत विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन पूर्णत: मोफत असून बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी सेक्रेटरी भूषण मोहिरे, गोविंद मिसाळे, डॉ. मनोज सुतार यासह इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू कुलकर्णी यांनी केले. मराठा मंदिर येथे सुरू असलेले प्रदर्शन 14 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे.
रांगोळा-मोडी लिपीतील पत्रांचा समावेश
प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये वापरलेल्या शस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्या काळी मराठ्यांचे आरमार कसे होते व त्यांच्या आरमारात कोणत्या युद्धनौकांचा समावेश करण्यात आला होता याची माहिती सुंदररीत्या देण्यात आली आहे. नाशिक येथील कलाकारांनी 36 ते 40 तास खर्चुन साकारलेल्या भव्य रांगोळ्या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. याचबरोबर मोडी लिपीतील छत्रपतींच्या घराण्यातील पत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
मिरवणुकीमुळे शिवप्रेमींमध्ये उत्साह
ढोल-ताशांचा गजर, लेझीमच्या तालावर लयबद्ध सादरीकरण करणारे चिमुकले, भगवे ध्वज अशा शिवमय वातावरणात सोमवारी मिरवणूक काढण्यात आली. गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. घोड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज, भगवे ध्वज घेऊन सहभागी तरुणींमुळे मिरवणुकीला ऐतिहासिक रूप प्राप्त झाले. यामध्ये शालेय विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. उद्योजक शिरीष गोगटे व भातकांडे स्कूलचे संचालक मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले.









