कोल्हापूर / दीपक जाधव :
2 एप्रिल हा जागतिक स्वमग्नता दिवस म्हणजे ‘ऑटिझम डे‘ जगभरात पाळला जातो. स्व:ताच्या विश्वातच रमणारी, मग्न असलेले मूल म्हणजे स्वमग्नता. याकडे पालकांनी वेळीच लक्ष दिले तर या विकारातून मुले बाहेर पडू शकतात.
स्वमग्नता हा आजार नसून ती एक अवस्था आहे. या अवस्थेत असलेली व्यक्ती, मुले ही स्वत:च्याच विश्वात आणि विचारात रमलेली असतात. एखादी गोष्ट त्यांना पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे त्यावर ते त्वरित प्रतिक्रिया देत नाहीत. आणि हेच या स्वमग्नतेचे लक्षण आहे. डॉक्टरांच्या मते हा विकार म्हणजे खूप गुंतागुंतीची मानसिक स्थिती असते. मुल लहान असते तेव्हापासून या विकाराची लक्षणे दिसत असतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले तर मूल या विकारातून बाहेर पडू शकतात.
भारतामध्ये दर 68 मुलांमागे 1 ते 1.5 टक्के मुलांमध्ये वयाच्या दोन ते नऊ वर्षापर्यंत च्या मुलामध्ये हा आजार आढळून येतो. सध्या भारतात जवळजवळ 18 दशलक्ष मुलामध्ये ऑटिझम असल्याचे निदर्शनास आले आहे. बालकांच्या विकासात्मक दोष आजारांमध्ये ऑटिझम चा तिसरा क्रमांक लागतो.
- ऑटिझम असलेल्या मुलांची लक्षणे
या आजारात प्रत्येकाची वेगवेगळी लक्षणे दिसुन येतात. साधारण दोन ऑटिस्टीक व्यक्तीची लक्षणे त्याची तीव्रता आणि त्याच्या वरचे उपचार हे सारखे असत नाहीत त्यामुळे या आजाराला फक्त ऑटिझम न म्हणता ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिस ऑर्डर ‘ असे म्हणतात. याची लक्षणे पुढील प्रमाणे.
– दुसऱ्या तिसऱ्या वर्षांपासून लक्षण दिसतात.
– मुलांच्या भाषा विकासास विलंब होणे.
– बोलण्याच्या प्रक्रियेस विलंब होणे.
– तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा सांगणे,उच्चारणे.
– एखाद्याने बोलावल तर प्रतिसाद न देणे.
– एकल कोंडेपणा कीवा ऐकटे रहाणे.
– आत्मविश्वासाने न बोलणे.
– एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे.
– दिवसाचे ठरलेल्या दिनक्रमा नुसार वागणे. बदल झाल्यास चिडणे.
– समोरच्याच्या भावना न समजणे
– एखादी वस्तू, त्याची नावे न ओळखणे.
– गोल फिरणारा पंखा, चक्र, भोवरा या गोष्टी आवडतात. तेही तसे गोल गोल फिरतात.
–सतत पळणे, उड्या मारणे, पाय आपटणे, कोणाशी नाते न ठेवणे. या आजारात मुलांमध्ये आक्रमकता आढळून येत असल्याने काहीतरी गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- ऑटिझम स्पेक्ट्रम डिस ऑर्डरचे प्रकार
– क्लासिकल ऑटिझम
– अस्परजर सिड्रोम.
–परव्हेजिव्ह डेव्हलपमेंट डिसऑर्डर नाईट ऑदरवाईझ स्टेसिफाईड (झ्अ –ऱ्ध्ए)
– चाईल्ड डिसइटीग्रेटीव्ह डिसऑर्डर
– सोशल कम्युनिकेशन डिसऑर्डर
– रेंट सिड्रोम
- ऑटिझमची कारणे
ऑटिझम ची निश्चित कारणे ही अद्यापही संशोधनाचा विषय आहे.
– अनुवंशिकता
– गुणसुत्रातील दोष.
– जवळच्या नात्यामधील लग्न.
– आई वडीलांच्या मधील वयाचे आतंर.
–इपीजनीक मॉडीफिकेशन.
–गरोदरपणातील जोखमीचे घटक.
– मातेला संसर्ग
– औषधाचा दुष्परिणाम
- ऑटिझमचे निदान
कान,डोळे तपासणी.
एमआरआय
मेटॉबॉलिक डिसऑर्डर तपासणी.
- उपचार
या आजारावर निश्चित असा औषध उपचार उपलब्ध नाही.निदान करणे व वेगवेगळ्या वर्तणुकीय गुणदोषावर थेरपी व्यवस्थापन करुन आजाराची तीव्रता कमी करता येऊन त्या रुग्णाला सामान्य व्यक्तीच्या प्रवाहात आणता येते.
- यासाठी उपलब्ध थेरपी
तज्ञा मार्फत तपासणी करून घेणे,यात बालरोग तज्ञ, लहान मुलाचे मेंदु विकारतज्ञ,
समुपदेशन व जीवन शैलीत योग्य बदल करणे,इन्हॉरमेंटल थेरपी,फॅमिली सपोर्ट
आपल्या मुलांमधील स्वमग्नता जाणून घ्या,जागृत व्हा,योग्य व्यवस्थापनाने मुलांना सामान्य प्रवाहात आणता येते आणि या समस्येचे निराकरण होऊ शकते.
–डॉ. बाबासाहेब थोरात, बालरोगतज्ञ ,सेवा रुग्णालय.
मुली पेक्षा मुलांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण जास्त असते. 75टकके मुलामध्ये अध्ययन अक्षमता असू शकते. तर 25 टक्के मुलामध्ये मतिमंदत्व असू शकते. तर काही मुलामध्ये सेरेबल पाल्सी असणे किवा काहींच्यात फिट येण्याचे प्रमाण असते.
– साधना गोडबोले.








