दहशतवादी निज्जरच्या हत्येचा घेणार सूड
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या सरी येथे दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या झाली होती. यानंतर अंडरग्राउंड झालेला शिख फॉर जस्टिस या संघटनेचा दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दहशतवादी पन्नू स्वत:चा सहकारी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा सूड घेण्याची धमकी देताना दिसून येतो. पन्नूने पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून धमकी दिली आहे.
राजीव गांधींना आठवून पहा. 2024 मध्ये खलिस्तान समर्थक शीख तुम्हाला शोधून काढतील, आम्ही उघडपणे फिरत आहोत. भारत सरकारमध्ये हिंमत असल्यास त्यांनी आम्हाला सामोरे जावे. वॉशिंग्टन डीसीबाहेर आम्ही उभे आहोत. आम्ही जनमत चाचणीसह स्वतंत्र पंजाब मिळवूच हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सांगू इच्छितो असे पन्नूने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
दहशतवादी पन्नूने ग्रीन स्क्रीनसमोर हा व्हिडिओ तयार केला आहे. तरीही तो स्वत: वॉशिंग्टन डीसीबाहेर उभा असल्याचा दावा करत होता. तर दहशतवादी पन्नू मागील 3 दिवसांपासून लपून बसला असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे सांगणे आहे.
काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या सरीमध्ये गुरुद्वारानजीक दहशतवादी पन्नूचा कॅनडातील सहकारी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. स्वत:च्या सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतर दहशतवादी पन्नू भयभीत झाला आहे. यापूर्वी ब्रिटनमध्ये दहशतवादी खांडाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांच्या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पन्नूने यापूर्वी केला होता.









